नागपूर : भारतात तब्बल आठ दशकांनंतर चित्त्यांचे आगमन झाले, पण पर्यटकांना अजूनही त्यांना पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून खुल्या पिंजऱ्यात आणि त्यानंतर जंगलात हे चित्ते सोडण्यात येणार होते. मात्र, खुल्या पिंजऱ्यात सोडण्यावरच शिक्कामोर्तब न झाल्याने त्यांचा जंगलातील पुढील प्रवासदेखील लांबला आहे.
१७ सप्टेंबरला नामिबियातून पाच मादी आणि तीन नर चित्ते भारतात आणण्यात आले. त्यानंतर या चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात विलगीकरणात ठेवण्यात आले.
विलगीकरणातून खुल्या पिंजऱ्यात आणि त्यानंतर जंगलात कधी सोडायचे याबाबत दोन वर्षांसाठी नऊ सदस्यीय ‘चित्ता टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आले. त्यांच्या बैठकीत चित्त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडण्याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही. कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘चित्ता टास्क फोर्स’ची दुसरी बैठक सोमवारी झाली. बैठकीला दोन सदस्य अनुपस्थित होते. त्यांना विलगीकरणातून पाच चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेल्या खुल्या पिंजऱ्यात स्थलांतरित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत आठही चित्त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडण्याबाबतची तारीख निश्चित झाली नाही, पण याच महिन्यात त्यांना जंगलात सोडण्यापूर्वी अनुकूल वातावरणात हलवले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना येथे सोडण्यात येईल.
दरम्यान, फ्रेडी, अल्टोन, सवाना, साशा, ओबान, आशा, सिबिली आणि सायसा या ३० ते ६६ महिने वयोगटातील पाच माद्या आणि तीन नर चित्ता विलगीकरणात आहेत. त्यांना सध्या एकाच वनक्षेत्रात, पण सहा ठिकाणी ठेवण्यात आले असून त्यांना म्हशीचे मांस दिले जात आहे. दुसऱ्या बैठकीतील चर्चेनंतर पर्यटकांच्या चित्त्यांना पाहण्याच्या आशा बळावल्या असल्या तरीही त्यांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
नवे काय? ‘चित्ता टास्क फोर्स’च्या सोमवारी पार पडलेल्या आणखी एका बैठकीत त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपवण्याचा निर्णय झाला तरी, त्यातून ते कधी बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झाले नाही.
केवळ चर्चा.. ९ ऑक्टोबरला ‘चित्ता टास्क फोर्स’ची बैठक पार पडली. त्यानंतर २७ ऑक्टोबरला कुनो राष्ट्रीय उद्यानाची बैठक झाली. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने २० सप्टेंबरला कुनो राष्ट्रीय उद्यान आणि इतर नियुक्त क्षेत्रांमध्ये चित्त्यांच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली होती.