नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प जागतिक स्तरावरील पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे या व्याघ्रप्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, चंद्रपूरपर्यंत येणाऱ्या पर्यटकांना येथून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या अडचणी आता लवकरच दूर होणार असून पर्यटकांसाठी चंद्रपूरवरून ताडोबाला जाण्याकरिता “क्रूझर सेवा” सुरू केली जात आहे.

चंद्रपूर शहरातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे सफारीसाठी जाण्याकरिता लवकरच “क्रुझर सेवा” सुरू होणार आहे. येत्या महिन्याभरात ही सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांचीही त्यांनी यासंदर्भात भेट घेत अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली संचालक, अशोक खडसे संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, वनविकास महामंडळचे चंद्रपूर प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प गाभा क्षेत्राचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू, मध्य-चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोडू, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

जंगल पर्यटनासाठी जागतिक पर्यटनाच्या नकाशावर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव कोरले आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा नाही. त्यामुळे ज्या पर्यटकांकडे स्वतःची वाहन व्यवस्था नाही त्या स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर “क्रुझर सेवा” सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला होता. ही मागणी आता पूर्णत्वास आली आहे आणि लवकरच चंद्रपूरवरून ताडोबासाठी “क्रूझर सेवा” सुरू होणार आहे.