नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरत आहे ती “एफ-२” वाघीण आणि तिचे पाच बछडे. याच वाघीण आणि तिच्या बछड्यानी अभयारण्यातील गाईड आणि जिप्सी ड्रायव्हर यांना अडचणीत आणले होते. त्यामुळे अजूनच त्यांना बघण्याची चुरस पर्यटकांमध्ये वाढीला लागली आहे. यातून “सेलिब्रिटी” तर सुटले नाहीतच, पण सरकारी अधिकाऱ्यांना देखील हा कुटुंबकबिला पाहण्याचा मोह आवरत नाही आहे.
अलीकडेच या अभयारण्यात “एफ-२” वाघीण आणि तिच्या बचड्यांचा रंगलेला मातृत्वाचा सोहोळा पर्यटकांना पाहायला मिळाला. अमरावती येथील अप्पर आयुक्त व वन्यजीवप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार गजेंद्र बावणे यांनी हा सोहोळा अचूक टिपला.उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ नंतर कधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा झाला ते कळलेच नाही. कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. त्यानंतर पुन्हा पर्यटकांनी पाठ फिरवली.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

आता ‘एफ-२’ नावाची वाघीणसुद्धा तिच्या पाच बछड्यांसह पर्यटकांना आकर्षित करत आहे. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ “एफ-२” नावाच्या या वाघिणीसह तिच्या पाच बछड्यांचे उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्याने पर्यटक सुखावले आहेत. “एफ-२” वाघीण ही “फेअरी” वाघिणीची मुलगी आहे. “एन-४” आणि “पाटील” नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता.

वाघीण आणि तिच्या बचड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये चुरस लागल्याने अक्षरशः त्या संपूर्ण कुटुंबाची वाट अडवण्याचा प्रकार दरम्यानच्या काळात झाला होता. ज्यामुळे पर्यटक मार्गदर्शक, वाहनचालकच नव्हे तर पर्यटकसुद्धा अडचणीत आले होते. वाहनचालक आणि पर्यटक मार्गदर्शक यांचे काही कालावधीसाठी निलंबन तर पर्यटकांना अभयारण्यात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे थोडीफार का होईना शिस्त लागली आहे. मात्र, वाघाच्या कुटुंब दर्शनासाठी अभयारण्य प्रशासनाच्या मर्जीतील रिसॉर्टचालकांकडून आगाऊ बुकिंग देखील करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना वाघाचे हे सहकुटुंब व्याघ्रदर्शन कठीण झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists witnessed f2 tigress motherhood ceremony captured by wildlife photographer gajendra bawane rgc 76 sud 02