नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि वाघांचे किस्से ऐकायला आले नाही असे कधी होत नाही. भारतातील जेवढ्या व्याघ्रप्रकल्पात घडत नसतील एवढे किस्से या व्याघ्रप्रकल्पात घडतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि स्वतः राज्याच्या वनखात्याने त्यांच्या फेसबुक पेजवर हे छायाचित्र प्रसिद्ध केले. हे छायाचित्र सुबोध जाधव या वन्यजीव छायाचित्रकाराने काढले आहे.
राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांचा आणि वाघांचा सामना रोजच होत असतो. पर्यटकांच्या वाहनासमोर कित्येकदा वाघ येऊन थांबलेला असतो. मात्र, अनेकदा जंगलालगतच्या गावकाऱ्यांसमोर देखील वाघ येऊन थांबलेला असतो. दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनासमोर कित्येकदा अचानकपणे वाघ येतो. गावकऱ्यांचा आणि वाघांचा सामना नेहमीच होतो. उन्हाळ्यात पाणवठ्यावर पाण्याच्या टँकर ची वाट बघत थांबलेला वाघ अनेकदा अनेकांनी पाहिलेला आहे. असाच प्रसंग ट्रॅक्टरस्वारांसोबत घडला. व्याघ्रप्रकल्पात कामे सुरू असल्याने अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. याचकामी व्याघ्रप्रकल्पात एक ट्रॅक्टर शिरले. मात्र, व्याघ्रप्रकल्पात जात असताना ट्रॅक्टरसमोर अचानक वाघ आला.
‘छोटा मटका’ची ख्याती
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘छोटा मटका’ या वाघाचे साम्राज्य आहे. या वाघाला न ओळखणारा पर्यटक दुर्मिळच. अतिशय धाडसी अशी ‘छोटा मटका’ या वाघाची ख्याती आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात त्याचे साम्राज्य आहे. कित्येकदा तो त्याठिकाणी असणाऱ्या पर्यटकांच्या निवाऱ्याच्या छतावर, तर कधी त्याठिकाणी असणाऱ्या रामदेगी येथील मंदिराच्या पायऱ्या चढताना, तर कधी मंदिराला फेऱ्या मारताना सुद्धा त्याला अनेकांनी पाहिले आहे. पर्यटकांच्या आणि छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यातून तो कधी सुटला नाही.
‘छोटा मटका’चा जन्म
‘छोटा मटका’ याचा जन्म ताडोबा कोअरमध्ये २०१६ साली झाला. त्याला मटकासुर नावाचा प्रसिद्ध नर वाघ आणि त्याची आई छोटी तारा यांनी जन्म दिला. त्याला ताराचंद नावाचा एक भाऊ होता पण आई छोटी तारा पासून विभक्त झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ‘छोटा मटका’ हे नाव त्याचे वडील “मटकासुर” यांच्यामुळे पडले .