भंडारा : ९० टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून १ लाख ३० हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून ३ लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झाला असून घोटाळेबाजाला पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

८ ते १० लाख किमतीचा ट्रॅक्टर ९० टक्के सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून १ लाख ३० हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून ३ लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजाच्या विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा घोटाळेबाज मागील सहा महिन्यांपासून फरार होता. भंडारा पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत अखेर या घोटाळेबाजाला गडचिरोलीतून अटक केली आहे.

हे ही वाचा… सतीची मूर्ती असलेले देशातील एकमेव मंदिर आहे या जिल्ह्यात

पुढे आलेल्या माहितीनुसार, भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यातचं नव्हे तर, या घोटाळेबाजाने राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातही जाळे पसरवून नागरिकांकडून कोट्यवधींची फसगत केल्याचं आता समोर आले आहे. मारोती अशोक नैताम (३५) असे कोट्यवधींने नागरिकांना फसविणाऱ्याचं नावं आहे. तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील रहिवाशी आहे. उच्च शिक्षित असलेल्या मारोती नैतामला मराठी, इंग्रजी, हिंदीसह एकूण नऊ भाषा बोलता येतात. त्यासोबतचं त्यानं नैतान या आडनावाचा गैरफायदा घेतला. नैताम हे आडनाव आदिवासींमध्ये आहे, मात्र हा ओबीसी (तेली) समाजाचा असतानाही त्यानं आदिवासी बांधवांना तो स्वतः आदिवासी असल्याचं सांगून आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन केला.

हे ही वाचा… अमरावती: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धेचा अमानुष छळ, मेळघाटातील दुर्देवी घटना

तसेच या घोटाळेबाजाने भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चिचोली येथे जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर लिमिटेड नावानं कंपनी स्थापन करून नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक केली. सबसिडीवर ट्रॅक्टर मिळविण्यासाठी अनेकांनी त्यांचे दागिने गहाण ठेवलेत, अनेकांनी शेती विकल्या तर काहींनी कर्ज घेऊन या ट्रॅक्टरसाठी या कंपनीत पैसे गुंतविले होते. आता हा घोटाळेबाज पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून भंडारा पोलीस त्याची चौकशी करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tractor scam exposed in bhandara tribals cheated in the name of subsidy ksn asj