अकोला : पश्चिम वऱ्हाडातील बाजार समित्या सोमवारी बंद असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. राज्यात पणन मंत्र्यांच्या विरोधात बाजार समित्यांनी आज बंद पुकारला होता. त्यामध्ये अकोल्यासह बहुतांश बाजार समित्यांनी सहभाग घेतला.
परिषदेत उडाला होता मोठा गोंधळ
निगडी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात गुरुवारी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने राज्यातील ३३० बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची परिषदेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात सायंकाळी मोठा गोंधळ उडाला होता. कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना आदी विषयावर संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची ही परिषद होती.
हेही वाचा >>>अधिकार आहेत तर मग निर्णय का नाही घेत? न्यायालयाने थेटच विचारले…
या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नियोजित होते. मंत्री सत्तार यांनी केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. यावेळी उपसभापती संतोष सोमवंशी बोलत असतांना त्यांनी ‘बारा-एक’च्या परवानगीत आर्थिक व्यवहार होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पणन मंत्र्यांनी संताप व्यक्त करून परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे उपस्थित सभापती नाराज झाले. सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या निषेधाचा ठराव देखील घेण्यात आला.
खरेदी-विक्रीचे कामकाज बंद, शेतकऱ्यांची अडचण
या प्रकरणी पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने राज्यातील ३३० बाजार समित्यांचा सोमवारी बंद पुकारला. या बंदला पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजार समित्यांमधील खरेदी-विक्रीचे कामकाज बंद होते. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या बाजार समितीपैकी एक असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद असल्याने परिसरात शुकशुकाट होता. अडते, खरेदीदार, कामगारांनी बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवले. या बंदमुळे आपला माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली.
हेही वाचा >>>बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन…
संपूर्णत: व्यवहार ठप्प
पुणे येथील बाजार समिती महासंघाने पुकारलेल्या बंदमध्ये अकोला बाजार समिती सहभागी झाली असून खरेदी-विक्रीचे संपूर्णत: बंद आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत, अशी माहिती अकोला बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी दिली.