नागपूर : कुटलाही व्यवसाय उधारी शिवाय चालत नाही, ठोक व्यापारी, उत्पादकांकडून उधारीवर माल घेतो, चिल्लर विक्रेता ठोक व्यापाऱ्याकडून माल घेताना अर्धी रोख व काही उधार ठेवतो, हीच परंपरा पुढे ग्राहकांर्पंत कायम राहते. एका निर्धारित वेळेनंतर उधारीची रक्कम परतही केली जाते.हा सर्व व्यवहार विश्वासार चालतो. वर्षानुवर्षापासून हे व्यवहार सुरू आहे. यातून उधार देणारा आणि उधारीवर माल घेणारा यांच्यात एक नात अधिक घट्ट होते. मात्र गेल्या काही दिवसात नागपुरात याला छेद देणाऱ्या घटना घडल्या आहेत. यामुळे उधार देणारे व्यापारी धास्तावले आहेत. त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली असून उधारी ‘नकोरे बाबा’ असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे. यासाठी कारण ही धक्कादायकआहे.
हेही वाचा >>> १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान, एक पीएसआय जखमी; गृहमंत्री जिल्ह्यात असताना गडचिरोलीत चकमक
नागपूर सुधार मंचचे अध्यक्ष व व्यावसायिक जयप्रकाश मालविया यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांची व्यथा मांडली. ते म्हणाले “ उधारी दिल्या शिवाय व्यवसाय चालत नाही, पण उधारी थकली आणि देणीदाराला ती मागायला गेलो की ते घरच्या महिलेला पुढे करतात, विनयभंगाची तक्रार करण्याची धमकी देतात, सक्ती केल्यास पोलिसांकडे तक्रार केली जाते आणि त्या तक्रारीच्या आधारावर पोलीस व्यापाऱ्यावरच गुन्हे दाखल करतात. सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेकांनी उधारी सोडून दिली आहे तर पोलीस कारवाईमुळे मानहानी झाल्याने काहींनी आत्महत्या केली आहे. अशास्थितीत उधारी वसूल करायची कशी? असा प्रस्न आहे” मालविया म्हणाले, सध्या व्यापारी मोठ्या संकटात आहे. व्यवसायाचा भाग म्हणून आम्ही उधारीवर माल देतो. निर्धारित वेळ निघून गेल्यावरही पैसे दिले नाही तर आम्ही देणीदाराला उधारीसाठी फोन करतो पण ते उचलत नाही. देणीदार ज्या ठिकाणी कामाला आहे तेथे गेल्यास तो भेटत नाही, त्यामुळे घरी जाण्याशिवाय पर्याय नसतो. पोलीस कारवाईमुळे व्यापारी भयभीत झाले आहे. गेल्या काही महिन्यात नागपुरातील एक नव्हे तर तब्बल २९ व्यापारी कुटुंबांना या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. मोठा व्यापारी, छोट्या व्यापाऱ्याला उधारी देतो. अशाच एका उधार घेणाऱ्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली व एका चिठ्ठीवर २१ व्यापाऱ्यांची नावे लिहीली. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. या व्यापाऱ्यांचे पैसेही गेले आणि त्यांना कारवाईला तोंड द्यावे लागले. हा व्यापाऱ्यांवर अन्याय आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त (झोन ३) यांना निवेदन देण्यात आले, असे मालविया यांनी सांगितले.