नागपूर : अंबाझरीपुढील रस्ता बंद केल्याने पर्यायी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. माटे चौक, अभ्यंकरनगर, बजाजनगर, गांधीनगर हा रस्ता मुळातच अरुंद असताना येथून मोठ्या प्रमाणात जड वाहने व शहर बसेस धावत असल्याने तासंतास वाहतूक कोंडीत सर्वसामान्य नागरिक अडकून पडत आहे.

त्यामुळे जड वाहनांना व शहर बसेसला या मार्गावरून बंदी घालावी ,अशी मागणी नागरिकांची आहे. राज्याचे उपमुख्मंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील हा प्रश्न आहे. अंबाझरी तलावाजवळील पुलाचे बांधकाम सुरु असल्यामुळे अंबाझरी टी-पॉईंट ते विवेकानंद स्मारक दरम्यानचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीने कळस गाठला आहे. रस्ता बंद असल्याने दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक मार्गावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा…कुलगुरू चौधरींमागचे शुक्लकाष्ठ संपेना….आता पुन्हा नव्या चौकशीचा ससेमीरा…….

गोपालनगर, सुभाषनगर, दीक्षाभूमी, प्रतापनगर, शंकरनगर चौक, एलएडी कॉलेज चौक, बजाजनगर, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, अभ्यंकरनगर चौक, विश्वेश्वरय्या चौक, दीनदयाल चौक परिसरातील नागरिक त्रस्त असून वाहतुकीच्या खोळंब्यामुळे नागरिकांच्या नाकी नऊ आले आहे.

या परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीसाठी लागणाऱ्या सिमेंटचे ट्रक, मिक्सर वाहने, विटांचे ट्रक आणि लोहसळाखीचे ट्रक आणि गिट्टी-मुरुमचे टिप्परांची मोठी गर्दी आहे. या परिसरात अजूनही जड वाहतूक सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

तसेच या परिसरातून अन्य परीसरात जाणाऱ्या शहरबसचेमार्गही बदलण्यात आले नाही. त्यामुळे ऐन वर्दळीच्या वेळी या बसेसची रस्त्यावर गर्दी होते. लांबलचक असलेल्या बसेस आणि टिप्पर-ट्रक आणि सिमेंट मिक्सरमुळे वाहतूक कोंडी होते. त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

हेही वाचा…यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण, १३ हजार रुपये मासिक विद्यावेतनही मिळणार, फक्त येथे अर्ज करा

हा परिसर म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत वाहतूक पोलीस आणि प्रतापनगर, बजाजनगर, सोनेगाव, अंबाझरी आणि सीताबर्डी पोलिसांचे विशेष लक्ष्य असते. मात्र, अंबाझरी पुलाचे बांधकाम सुरु झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांना सर्वाधिक त्रास व्हायला लागला. या परीसरात राहणाऱ्या नागरिकांना घरी पोहचण्यासाठी तासभर वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. या प्रकरणाची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, यासाठी अनेकांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली. मात्र, भाजप नेत्यांनीही पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा सल्ला देऊन वस्तीतील लोकांची बोळवण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वस्तीतील नागरिक राजकीय नेत्यांवर चिडून आहेत.

व्हिएनआयटी प्रवेशद्वार सुरु करा

अंबाझरी परिसरातीलच नव्हे तर या रस्त्याचा वापर करुन हिंगणा-प्रतापनगर-जयताळा परीसरात जाणाऱ्या नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. व्हिएनआयटी प्रवेशद्वार सुरु केल्यास अनेक वाहनांचा रस्त्यावरील भार हलका होईल. मात्र, व्हिएनआयटीने प्रवेशद्वार उघडायला नकार दिला आहे. त्यामुळे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून सामान्य नागरिकांना मदत होईल, यासाठी प्रयत्न करावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. .

एकाच रस्त्यावर ८ तास खोळंबा

विश्वश्वरैया चौकापासून ते एनआयटी स्विमींग टँक चौकापर्यंतच्या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी एशी ८ तास वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र, दोन कोपऱ्यावर दोन वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येतात. मात्र, वाहनांची संख्या बघता वाहतूक पोलीस हतबल असतात. तसेच या रस्त्यावर पायी चालणाऱ्यांसुद्धा जागा नसते, परंतू, दोन ते तीन हजार रुपयांच्या हप्त्यासाठी पाच ते सहा ज्युसविक्रीचे ठेले, फळविक्री करणाऱ्या ठेले लागलेले असतात. त्यांच्यावर मात्र काही कारवाई करण्यात येत नाही.

हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या पुतळ्याला काळे फासले…. बावनकुळेंच्या वाहनावर जोडा…..

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर व्हावी कारवाई

अंबाझरी टी-पॉईंट ते अभ्यंकरनगर चौकापर्यंतची वाहतूक कोंडी बघून अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवून वाहतुकीचा खोळंबा करतात. कुणी त्यांना हटकले तर थेट हमरीतुमरीवर येतात. चक्क कार किंवा ऑटोचालकसुद्धा विरुद्ध दिशेने यू टर्न घेऊन परत जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या परिसरात वाहतूक पोलिसांची कारवाई होत नसल्यामुळे वाहनचालक बिनधास्त विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. परिणामतः वाहतूक कोंडी निर्माण होते.

काय म्हणतात नागरिक…

वाहतूक कोंडीमुळे महापालिका-पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचे वाभाडे निघाले आहे. १० मिनिटाचे अंतर कापण्यासाठी चक्क तासभर कोंडीत अडकावे लागत आहे. यावर तोडगा निघायला हवा. – यशवंत सुखदेवे (परीसरातील नागरिक)

हेही वाचा…नागपूर : वेळापत्रकात बदल करताच मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ

जड वाहनांना बंदी घाला

टिप्पर आणि ट्रकसारखे वाहने या रस्त्यावरून जात असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे जोपर्यंत अंबाझरी रस्ता सुरू होत नाही, तोपर्यंत या मार्गावरून जड वाहने बंद करावी. – भारती लोणकर (दुचाकीचालक)