नागपूर : आयटी पार्क ते माटे चौकापर्यंतचा रस्ता खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गिळंकृत केल्याने या परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. ही बाब लक्षात घेऊन सोनेगाव वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दुकाने बंद करायला लावली. परंतु, पोलीस माघारी फिरताच दुकाने पुन्हा सुरू झाली.
आयटी पार्क ते माटे चौकापर्यंतच्या रस्त्यावर विनापरवानगी जवळपास शंभरावर खाद्यपदार्थांची दुकाने सुरू आहेत. चक्क पदपथावर खुर्च्या टाकून ग्राहकांना खाद्य पुरवले जात आहे. आधीच दुकानांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यात पुन्हा ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत. त्यात पुन्हा खाद्यपदार्थाला तिखट फोडणी दिली जात असल्याने तो तिखटपणा वाऱ्यात मिसळून वाहनचालकांच्या डोळयात गेल्याने अनेकांना वाहनावरच भोवळ येते.
हेही वाचा…रुसवे, फुगवे अन गोडवे! कारागृहातील कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट
अशा अनेक कारणांमुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ‘लोकसत्ता’ने नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडली. त्यानंतर सोनेगाव वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी शुक्रवारी रात्री कारवाई केली. परंतु, या कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी पोलिसांच्या नाक्कावर टिच्चून सकाळपासूनच या रस्त्यावर पुन्हा दुकाने सुरू झाली.
महापालिकेकडून झोपेचे सोंग
नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, या विक्रेत्यांकडून बक्कळ पैसे मिळत असल्याने महापालिकेचे पथक झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत, असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा…चंद्रपूर जिल्ह्यातील ‘डायनोसॉर’चे जीवाश्म स्थळ नष्ट
‘हप्ता’ वाढवून मागत असल्याची तक्रार
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात आयटी पार्क चौकातील अतिक्रमणावर नियमित कारवाई होत होती. मात्र, नवे आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या कार्यकाळात पोलिसांनी कारवाई करणे बंद केले आहे. पोलीस आणि महापालिकेचे पथक दरमहिन्याला हप्ते घेत असून आता तर कारवाई न करण्यासाठी हप्ता वाढवून मागत असल्याची माहिती दुकानदारांनीच नाव न छापण्याच्या अटीवर दिली.