अनिल कांबळे, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी व्हावा आणि वाहतूक कोंडी टळावी यासाठी उड्डानपुलाची निर्मिती केल्या जाते. मात्र, उड्डानपुलाच्या चढ आणि उतार अशा दोन्ही बाजुंना वाहतूक कोंडीची नवीन समस्या उद्भवल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिघोरी उड्डानपूल जड वाहनांसाठी वरदान ठरला असला तरी सामान्य नागरिक वाहतूक कोंडीच्या कचाट्यात सापडले आहेत.
हेही वाचा >>> वसंतामध्ये आसमंतात मनमोहक घडामोडींचा बहर; ग्रहांची युती व अवकाश केंद्राच्या दर्शनाची पर्वणी
दिघोरी उड्डानपुलामुळे ताजबाग ते नरसाळा हा रस्ता अगदी सोपा झाला असून या रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाली आहे. तसेच उड्डानपुलामुळे बेसा पॉवर हाऊस ते खरबी चौकापर्यंत वाहनांना गती मिळाली आहे. या उड्डानपुलामुले वाहतूक सुरळीत झाली असली तरी परीसरातील नागरिकांनासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. दिघोरी उड्डानपुलाची सुरुवात होणाऱ्या बेसा पॉवरहाऊस चौकात जड वाहनांची मोठी गर्दी असते. कारण उड्डानपुलावरून शहराबाहेर किंवा कळमना मार्केटला जाणाऱ्या जड वाहनांची मोठी संख्या आहे. त्यामुळे बेसा पॉवर हाऊस चौकातून दुचाकी-चारचाकी वाहनांना वाट काढताना जड वाहनांना प्राधान्य द्यावे लागते. त्यानंतरच लहान वाहने जाऊ शकतात. अन्यथा भरधाव असलेली माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची धडक होऊन अपघातीची भीती नेहमीसाठी आहे. बेसा पॉवर हाऊस चौकातील नेहमीच्या कोंडीला परीसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. तसेच दिघोरी उड्डानपुलाच्या शेवटी ओंकार सेलिब्रेशन चौकाजवळही वाहतूक कोंडी होते.
हेही वाचा >>> दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ! राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुलढाणा मतदारसंघाचा आढावा; राजेंद्र शिंगणे तिसऱ्यांदा मैदानात…
उड्डानपुलावरून भरधाव वाहने येत असल्यामुळे अन्य रस्त्यावरील वाहनांसाठी ही स्थिती धोकादायक आहे. दिघोरी उड्डानपुलावरून भरधाव आलेली वाहने खरबी चौकातील सिग्नलवर थांबतात. त्यामुळे वाहनांची मोठी रांग या चौकात नेहमी दिसते. या चौकातूनही आपापल्या घराकडे परतणारे किंवा चौक पार करून शहरात जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. उड्डानपुलामुळे जड वाहतूक सुधरली पण चौकात वाहतूक कोंडी वाढल्याचे चित्र आहे.
पुलाला मोकाट जनावरांचा विळखा
जड वाहनांच्या वाहतुकीसाठी वरदान ठरलेल्या दिघोरी उड्डानपूलाच्या दोन्ही बाजुला झोपडपट्टीबहुल वस्ती आहे. या वस्तीत अनेकांकडे गायी, म्हशी, बकऱ्या आहेत. सकाळी १० नंतर गुरांचे मालक पाळीव प्राण्यांना मोकाट सोडतात. ते गुरे थेट उड्डानपुलावर येतात. मोकाट प्राण्यांमुळे या उड्डानपुलावर यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. सुसाट धावणाऱ्या कार आणि दुचाकीस्वारांसाठी मोकाट जनावरे मृत्यूच्या विळख्याप्रमाणेच असल्याचे चित्र आहे.
पुलावरून चक्क ‘रॉंगसाईड’ वाहने
उड्डानपुलाच्या एका बाजुकडून दुसऱ्या बाजुकडे जाण्यासाठी थेट दोन किमीचा फेरा घ्यावा लागतो. दिघोरी चौक किंवा बेसा पॉवर हाऊस चौकातून वळण घ्यावे लागते. हा फेरा वाचविण्यासाठी कार, ऑटो, रिक्शा, दुचाकीचालक वाहन पुलावर नेतात आणि काही अंतर पार केल्यानंतर विरुद्ध बाजुने वाहन चालवत दुसऱ्या बाजुने जातात. हा प्रकार सर्रास होत असल्यामुळे पुलावर नेहमी अपघातसदृष्य स्थिती निर्माण होते.
पुलाच्या बाजुला अरूंद रस्ते
उड्डानपुलाच्या दोन्ही बाजुंनी अरुंद असे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यावर नेहमी वाहनचालक विरुद्ध दिशेने येताना दिसतात. या अरुंद रस्त्यावरच अनेक भंगारवाल्यांनी दुकाने थाटलेली आहेत. रस्त्यावर भंगारासह भंगाराची वाहतूक करणारी वाहने उभी असतात. तसेच रस्त्यावरच वजन-काटा लावून भंगार खरेदी केल्या जाते. त्यामुळे उड्डानपुलाला भंगार आणि हातठेल्यांचा विळखा निर्माण झाला आहे.
काय म्हणतात पोलीस
उड्डानपुलाकडे जाणाऱ्या मानेवाडा चौक ते उदयनगर चौक दरम्यान संबंधित विभागामार्फत संयुक्तिक पाहणी केली आहे. नव्या उड्डाणपूल बांधण्याबाबत परिक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. बेसा पॉवर हाऊस चौकातील लेन कटिंग मोठी करणे शक्य नाही. रॉंग साईड येणाऱ्या वाहनांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
– रितेश अहेर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.
उड्डानपुलामुळे ताजबाग ते दिघोरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुलभता निर्माण झाली आहे. मात्र, उड्डानपुलाखाली दिघोरी चौकातच खासगी बसचा थांबा आहे. त्या थांब्यामुळे येथून वाहने काढताना खूप त्रास होतो. दिघोरी चौकात ऑटोचालक मनमानी करीत कुठेही ऑटो थांबवून रस्ता अडवून बसतात. वाहतूक पोलीस अनेकदा नसतात. ते कुठेतरी चौकात घोळका करुन वसुली करणाऱ्यावर भर देतात. हे चित्र बदलायला हवे. – प्राजक्ता शंभरकर (विद्यार्थिनी-नरसाळा)