शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी

मंगेश राऊत, नागपूर</strong>

घर व इमारतींचे बांधकाम करण्यासाठी सरकारने व महापालिकेने काही नियम घालून दिले आहेत. पण, हे नियम वेशीवर टांगून  घर व इमारती उभ्या केल्या जात आहेत.  वाहतळासाठी जागा न सोडने, वाहनतळाच्या जागेचा गैरवापर करणे, असे प्रकार सर्रास सुरू असतील तर वाहतळाची व्यवस्था कशी सुधारेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धंतोली, रामदासपेठ व धरमपेठ या परिसरांमध्ये रुग्णालये आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये वाहने उभी करण्यासाठी पुरेसे वाहनतळ नसल्याची बाब वारंवार अधोरेखित झाली आहे. त्यामुळे परिसरात सतत वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. या भागातून रुग्णवाहिका किंवा अग्निशमन विभागाची वाहनेही सहजपणे निघू शकत नाही. आपत्कालीन परिस्थितीत या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र होते. पण, यासाठी लोकांनी रस्त्यांवर वाहने उभी करणे, हा एकमेव उपाय नाही. लोकांना वाहने उभी करण्यासाठी व्यापारी प्रतिष्ठाने व रुग्णालयांमध्ये पुरेशी जागाच नसते. एखाद्या ठिकाणी वाहनतळाची सुविधा असल्यास त्या ठिकाणी स्वागतकक्ष, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची सोय, रुग्णांच्या नातेवाईकांना डबे खाण्याकरिता उपलब्ध करून दिली जाते. हल्दीराम व इतर प्रतिष्ठानांमध्ये वाहनतळाची व्यवस्था असेल तर ग्राहकांच्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही. त्या ठिकाणी पॅकेजिंगचे काम करण्यात येते. रुग्णालयांमध्ये वाहनतळ केवळ डॉक्टरांच्या वाहनांसाठी उपलब्ध असते. रुग्णालयांतील सुरक्षा रक्षक डॉक्टर वगळता रुग्णांच्या नातेवाईकांना वाहने बाहेर उभी करण्यास सांगतात. इमारत व घरांचे बांधकाम करीत असताना वाहनतळ निर्माण करणे व त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्याशिवाय वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही. गेल्या आठवडय़ात वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी धंतोली व रामदासपेठ परिसरातील डॉक्टर व इतर प्रतिष्ठानांच्या मालकांची बैठक घेऊन वाहनतळाचा उपयोग करण्याची विनंती केली. पण,

पोलीस व महापालिका प्रशासनाने नुसती विनंती करून चालणार नाही कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया समाजात उमटत आहे.

हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकामाला आवश्यक

नगरविकास विभागाने नागपूर महापालिकेसाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये वाहनतळासाठी किती जागा सोडावी, हे स्पष्ट केले आहे. हजार चौरस फुटापेक्षा अधिकचे बांधकाम असल्यास त्या ठिकाणी एक कार, दोन दुचाकी व दोन सायकलच्या वाहनतळाची जागा असणे आवश्यक आहे. त्याशिवाय एकापेक्षा अधिक कुटुंब राहण्याची व्यवस्था असणाऱ्या १५० चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रातील इमारतींमध्ये दोन कार, दोन दुचाकी, दोन सायकलसह आणि अभ्यागतांसाठी एकूण वाहनतळाच्या ५ टक्के जागा उपलब्ध असायला हवी.

रुग्णालय, सिनेमागृहात बेड व खुर्च्यानिहाय वाहनतळ

रुग्णालयाचे बांधकाम करताना प्रत्येक दहा खाटांमागे दोन कार, सहा दुचाकी, पाच सायकल आणि अभ्यागतांसाठी ५ टक्के अधिक वाहनतळ निर्माण करण्यात यावे. रुग्णालयात खाटांच्या संख्येसोबत वाहनतळ वाढवण्याचे नियम आहे.  सिनेमागृहात प्रत्येक ४० खुर्च्यामागे चार कार, १२ दुचाकी आणि आठ सायकलचे वाहनतळ, खुर्च्याच्या संख्येप्रमाणे वाहनतळ निर्माण करणे गरजेचे आहे.

तारांकित हॉटेल्समध्ये पाच खोल्यांमागे तीन कार

तारांकित हॉटेल्समध्ये प्रत्येकी पाच खोल्यांमागे मागे तीन कार, सहा दुचाकी व चार सायकलच्या वाहनतळाची सुविधा असायला हवी. विकास नियंत्रण नियमानुसार, शहरातील इमारतींमध्ये बांधकाम करून त्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास बहुतांश भागातील वाहतनळाची समस्या सुटू शकते. पण, नियम वेशीवर टांगून मंजूर नकाशाचे उल्लंघन करून बांधकाम होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

रहिवासी घर, सदनिका व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या इमारतीला मंजुरी देताना वाहनतळासाठी जागा असल्यासच नकाशा मंजूर होतो. एकदा बांधकाम झाल्यानंतर इमारतीचा सव्‍‌र्हे करून मंजूर नकाशानुसार वाहनतळाची जागा सोडली असेल तरच भोगवट प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे नागरिकांनी सदनिका खरेदी करताना बिल्डर्सना भोगवटा प्रमाणपत्राची मागणी करावी.

– प्र. भा. गावंडे, सहाय्यक संचालक, नगररचना विभाग.