बुलेटच्या ‘सायलेन्सर’मध्ये बदल करून मोठमोठ्याने फट्ट असा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने अंकुश ठेवला आहे. मात्र, आता चक्क कारच्या ‘सायलेन्सर’मध्ये बदल करून फटाक्यांसारखा आवाज काढून भरधाव कार पळवण्यात येत होती. वाहतूक विभागाने फटाके फोडणाऱ्या कारवर कारवाई करीत चालकावर कारवाई केली आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण : मेट्रोच्या नकाशावर आता विदर्भही… ब्रॉडगेज मेट्रोचा प्रयोग यशस्वी होईल का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा मालक समीप विशाल भसीन (२५, रा. जरीपटका पोलीस ठाण्याच्या मागे) याने रायसोनी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. तो उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना होणार आहे.त्याचे वडिलांचा जेसीबीचा व्यवसाय आहे. त्याने स्कोडा (एमएच २६ व्ही ९९९९) कारच्या सायलेन्सरमध्ये बदल केला. बुलेटप्रमाणे फट्ट असा आवाज कारमधून निघावा यासाठी हा बदल केला. गेल्या काही दिवसांपासून समीप हा आपल्या मित्र-मैत्रिणीसह रात्रीच्या सुमारास धरमपेठ, लक्ष्मीनगर, बजाजनगर, सीताबर्डी, रामदासपेठ आणि सिव्हिल लाईन परिसरात ‘फट्ट’ असा आवाज काढून त्रस्त करीत होता.
हेही वाचा >>>‘आयआयएम नागपूर’कडून नौदलास व्यवस्थापनाचे धडे
त्या कारच्या आवाजामुळे जवळपास २६ तक्रारी पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी कारवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार इंदोरा वाहतूक विभागाचे प्रमुख प्रशांत माने यांनी सोमवारी दुपारी कार जप्त केली. कारवर चालान कारवाई करीत सायलन्सर बदलवून घेतले. त्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.