नागपूर : पावसाळा सुरू होताच शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत आहे. मात्र, वाहतूक शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वाहन चालकांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर वाहतूक पोलीस दलात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे वारंवार अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, वाहतूक पोलीस सिग्नलवर न थांबता कोपऱ्यात घोळका करून सावज शोधत असतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडाची भीती दाखवून दिवसभर चिरीमिरी घेण्यात वेळ घालवतात. हा सर्व प्रकार सामान्य नागरिक बघत असतो. त्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली असताना पोलीस वसुलीत व्यस्त असतात. त्यामुळेच शहरातील वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: शंभर वर्षात प्रथमच जुलै महिन्यात २४२ मिमी पाऊस

पोलिसांचा वचक संपला

रस्त्यावरील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते तसेच पदपाथावरील फुटकळ विक्रेते वाहतूक पोलिसांना महिन्याकाठी लाच देतात व पदपाथ विकत घेतल्यासारखेच वागतात. धरमपेठ, सातीबर्डी, सक्करदरा, बुधवारी बाजार, तुकडोजी चौक, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, अशोक चौक, धंतोली, मानस चौक, कॉटन मार्केट चौक, मंगळवारी बाजार, आयटी पार्क चौक, जयताळा बाजार आदी ठिकाणी हातगाडीवाले पदपाथावर भाजीपाला व फळे विक्री करतात. त्यांच्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबते. मात्र, वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत.

विरुद्ध दिशेने वाहन दामटणाऱ्यांची संख्या वाढली

वाहतूक पोलिसांचा वचक संपल्यामुळे अनेक वाहनचालक सिग्नलचे पालन करीत नाहीत. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑटोचालक रस्त्याच्या मधोमध ऑटो थांबवून प्रवासी भरतात. थांबा नसलेल्या ठिकाणी रस्त्यावरच बस उभी करून खासगी बसचालक प्रवासी घेतात आणि उतरवतात. पोलीस असतानाही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत.

हेही वाचा – वर्धा : शाब्बास! वन्यजिवांच्या हिताचे कार्य, वनमंत्र्यांनी थोपटली आमदारांची पाठ

तीन मिनिटांच्या प्रवासासाठी ३० मिनिटे

अजनी रेल्वे पुलावरून मेडिकल रुग्णालयाकडे जाताना केवळ तीन मिनिटांचा वेळ अपेक्षित आहे. परंतु, सायंकाळी आणि सकाळी तेथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने तब्बल ३० मिनिटांचा वेळ लागतो. पाचपावली-इंदोरा पूल, रेल्वस्थानक पूल, सक्करदरा पूल आणि छावणी पुलाचीही स्थिती अशीच आहे.

अजनी पुलावर वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे, पूल अरुंद असून नवीन पूल होईपर्यंत तेथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या असेल. कर्मचारी तैनात केले आहेत. तात्पुरते कठडेसुद्धा लावले आहेत. नेहमी वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे शोधली आहेत. तेथे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि गस्त वाढवली आहे. – विनोद चौधरी, प्र. सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic in nagpur city during monsoon season adk 83 ssb
Show comments