नागपूर : ‘समृद्धी एक्सप्रेस-वे’ झाल्यापासून नागपूरहून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसगाड्या अमरावती मार्गाऐवजी समृद्धी महामार्गाकडून वळवण्यात आली आहे. त्यासाठी या बसगाड्या छत्रपती चौकातील मेट्रो स्टेशनखाली उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे वर्धा मार्गावरील या चौकात वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वर्धा मार्गावर छत्रपती चौकातील मेट्रो स्टेशननंतर स्नेहनगर बसथांबा देण्यात आला आहे. मात्र, बसगाड्या मेट्रो स्टेशनच्या खाली उभ्या केल्या जातात. त्यामुळे खामला चौक, अजनी चौक आणि नरेंद्रनगर पुलाकडून वर्धेकडे जाणारी वाहने छत्रपती चौकात अडकून पडत आहेत. या चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे मात्र वाहतूक पोलीस दुर्लक्ष करताना दिसतात.

वर्धा मार्गावरून चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि हैदराबादकडे वाहने जातात. शिवाय याच मार्गावरून नवीन नागपूर म्हणून ओळखले जाणारे मनीषनगर, बेसा, पिपळा, बेलतरोडी, चिंचभवन, मिहानकडे वाहने जात असतात. परिणामी, छत्रपती चौक ते खापरी रेल्वे उड्डाणपूलपर्यंतचा मार्ग अतिशय व्यस्त असतो. परंतु, या चौकात वाहतूक खोळंबा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, चौकातील सिग्नल लाल होण्यापूर्वी निघण्याचे प्रयत्न करणारे वाहन चालक जोरात हार्न वाजवून ध्वनी प्रदूषणात भर घालताना दिसतात. खासगी बसगाड्या प्रवासी घेतल्याशिवाय हलत नाहीत. हे सर्व वाहतूक विभागाच्या आशीर्वादाशिवाय शक्य नसल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. शिवाय चौकात ऑटो चालक, हातठेले देखील उभे असतात. त्यामुळे चौक ते मेट्रो स्टेशन दरम्यान अख्खा रस्ता जाम केला जातो. त्यावर लगाम लावल्याची तसदी वाहतूक पोलीस का घेत नाहीत? मोठा अपघात होऊन एखादा जीव गेल्यावरच यंत्रणांचे डोळे उघडतील काय, असा प्रश्न मनीषनगर येथील शीतल मुळे यांनी केला.

छत्रपती चौकात हैदराबाद, पुणे, मुंबईला जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचे ट्रॅव्हल्स कंपन्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी प्रवासी बसगाड्यांची प्रतीक्षा करत असतात. यामुळे खासगी बसगाड्या या चौकातच थांबतात. जणू काही खासगी बसगाड्यांचा थांबाच हा चौक आहे.

पायी चालणाऱ्यांचीही कोंडी

छत्रपती चौकात खासगी बसगाड्या उभ्या असतात. येथे पानटपरी, हातठेले, ऑटोरिक्षा, ई-रिक्षा उभे असतात. येथील पदपथ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यापले आहे. त्यामुळे या भागातून पायी चालणे महाकठीण काम आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहचण्याची आणि तेथून जवळपासच्या परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.