लोकसत्ता टीम
नागपूर : इंग्लंड विरुद्ध भारत संघादरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामन्यासाठी पोलिसांनी वाहतूक नियोजन केले. पण सामना सुरू होण्यापूर्वी दुपारी जामठा टी पॉइंट आणि वर्धा मार्गावर काही वाहनांच्या गर्दीमुळे काही कोंडी झाल्याचे दिसून आले. पोलिसांच्या हस्ताक्षेपानंतर वाहने पुढे निघाली. वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी गेल्या तीन दिवसांपूर्वीच जामठा स्टेडियमवर जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचे नियोजन केले होते.
क्रिकेट प्रेमींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. सामना डे -नाईट असला तरी दुपारी एक वाजतापासूनच नागपूरकर प्रेक्षक स्टेडियमकडे रवाना होऊ लागले. दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढली. विशेषतः जामठा टी पॉइंट, वाहनतळाकडे जाताना दुपारीच वाहन कोंडी झाली.
वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेकडून जवळपास ६०० पोलीस कर्मचारी झिरो माईल चौक ते जामठा स्टेडियमपर्यंत तैनात ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाहने वर्धारोडवरुन जामठा स्टेडियमकडे पोहचले. वाहतूक शाखेने ‘डिजिटल मॅप’सुद्धा जाहीर केला होता आणि त्याचा उपयोग करुन गर्दी टाळण्याचे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केले होते.अनेकांनी वेळेवर रॉंगसाईड वाहने नेली. स्टेडियमपासून एक किमी अंतरावर वाहनस्थळ असल्याने अनेकांना जामठा स्टेडियमकडे जाण्यासाठी बराच उशिर झाला.
पोलीस सकाळपासूनच तैनात
नागपूर शहर पोलीस दलातील जवळपास २ हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांवर क्रिकेट सामन्यांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. पोलिसांनी गुरुवारी सकाळपासूनच स्टेडियमचा ताबा घेतला. जामठा मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. पोलीस आपापल्या तैनातीवर रुजू झाले आहेत. क्रिकेटप्रेमीनी शिस्त पाळल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्याची माहिती समोर आली नाही.