चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्याने अरुंद झाल्यानंतर आता शहरातील मुख्य गांधी चौक ते जटपुरा गेट या मुख्य मार्गावर ‘संडे मार्केट’ने अतिक्रमण केल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, संडे मार्केटच्या या अतिक्रमणाकडे जिल्हा व पोलीस प्रशासनाप्रमाणेच महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. संडे मार्केटचे अतिक्रमण हा मुख्य मार्ग कधी गिळंगृत करेल याचा काही नेम नाही.
या शहराला सध्या अतिक्रमणाने विळख्यात घेतले आहे. शहराच्या चारही बाजूंनी अतिक्रमण सुरू आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणाकडे जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग तसेच महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. चंद्रपूर-नागपूर या महामार्गावर खासगी प्रवासी वाहने, ट्रॅव्हल्स तसेच चायनिज, बिर्याणी, न्युडल्स, फळ विक्रते, पाणीपुरी, भाजी विक्रेते, खासगी चारचाकी, दुचाकी वाहन विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर अनेक हॉटेल तथा शोरूमच्या मालकांनीही अतिक्रमण केले आहे. तोच प्रकार आता शहराच्या आतही बघायला मिळत आहे. आझाद बगीच्याचे बाजूला सिटी हायस्कूल ते धनराज प्लाझा या मार्गावर प्रत्येक रविवारी संडे मार्केट लागायचे. मात्र या मार्गावरील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे या मार्गावर संडे मार्केट लावू नये असे फर्मान महापालिकेने दिले आहे. मात्र आता तेथील संडे मार्केट मुख्य मार्गावर येऊन बसले आहे. गांधी चाैक ते जटपुरा गेट या शहरातील एकमेव मुख्य मार्गावर मागील दोन रविवार पासून संडे मार्केटची दुकाने थाटायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम या मार्गावरील वाहतूक पूर्णत: खाेळंबली आहे. या मार्गावर शहरातील सर्व मोठी शोरूम, कापड दुकाने, मोबाईल शॉपी तथा इतर व्यावसायिकांची दुकाने आहेत. वर्षाला हे सर्व व्यावसायिक महापालिकेला कोट्यवधीचा मालमत्ता कर देतात.
हेही वाचा >>>अधिवेशनापूर्वीच आमदार निवासांतील वीज पुरवठा खंडित, अधिकारी म्हणतात…
मात्र आता या व्यावसायिकांच्या दुकानांसमोरच संडे मार्केटची दुकाने लागत आहे. केवळ रस्त्यावरच ही दुकाने नाही तर हळूहळू संडे मार्केटच्या दुकानदारांनी हा रस्तच गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मार्गाने रुग्णवाहिका, किंवा बस, ऑटो, चारचाकी व दुचाकी नेताना गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे. महापालिका व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे मुख्य मार्गावरचे हे अतिक्रमण वाढत चालले आहे. हीच स्थिती राहिली तर पुन्हा जैसे थे स्थिती होण्यास वेळ लागणार नाही अशी तक्रार या मार्गावरील व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. या मार्गावर शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच शहरातील नामांकित डॉक्टरांचे दवाखाने आहेत. त्यामुळे रुग्णांना रविवारी या मार्गाने जाणे येणे कठीण झाले आहे. केवळ मुख्य मार्गच नाही तर संडे मार्केट जयंत टॉकिजपासून तर न्यू इंग्लिश हायस्कूल, डॉ. झाडे हॉस्पिटलपर्यंत अतिक्रमण आहे. तिकडे कस्तुरबा मार्गावर ज्युबिली हायस्कूल, कन्नमवार शाळेपासून तर स्टेट बँकेपर्यंत संडे मार्केट वाढले आहे. त्यामुळे या संडे मार्केटला इतरत्र जागा देऊन त्यांची व्यवस्था करावी, मुख्य मार्ग तात्काळ मोकळा करावा अशी मागणी समोर आली आहे.