नागपूर : उत्तर अंबाझरी मार्गावरील अलंकार चौकाजवळील हडस शाळेसमोर होणारी वाहतूक कोंडी विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू लागली आहे. यावर अद्याप पोलिसांना तोडगा काढता आला नाही. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर अंबाझरी मार्गावरील अलंकारनगर चौकाजवळ हडस माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या अगदी काही फुटांच्या अंतरावर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची शाळेच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वाहनांचीसुद्धा वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेच्या अगदी भिंतीला लागून चहाचे दुकान, नाश्त्याचे हातठेले आहे. तेथे विजेच्या रोहित्राला लागून सिलिंडरचा वापर केला जातो. त्याचा स्फोट झाल्यास अनर्थ होऊ शकतो. हडस शाळेच्या अगदी २० फुटांवर मेट्रो स्टेशन आहे. तसेच बाजूलाच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मोठे सभागृह आहे. मेट्रो स्टेशनवरून बाहेर येणाऱ्या प्रवाशांमुळे रस्त्यावर बरीच गर्दी असते.

हेही वाचा – नागपूर : अपहरणनाट्य! ‘मुलगा सुखरुप पाहिजे असेल तर…’

वाहतूक पोलीस बघ्याच्या भूमिकेत

अलंकार चौकातून थेट झाशी राणी चौकात वाहतूक पोलिसांची दिवसांतून दोनदा गस्त असते. मात्र, शाळेसमोर उभ्या वाहनांवर कारवाई करीत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. पदपथावर मोठी वाहने उभी असतात. त्या वाहनांना कधीच ‘जॅमर’ लावले जात नाही. त्यामुळे पोलिसांनी हडस शाळेसमोर वाहतूक कोंडीबाबत गांभीर्य दाखवायला हवे.

पदपथावरील नर्सरीमुळे त्रास वाढला

शाळेला लागूनच पदपथावर नर्सरी लावलेली आहे. येथे रोपटे विकत घेण्यासाठी कारचालक आणि दुचाकीचालक रस्त्यावरच दुचाकी लावतात. त्यामुळे शाळेसमोर वाहतूक खोळंबते. विद्यार्थ्यांना शाळेत सोडणारी आणि शाळेतून घरी नेणारी वाहनेसुद्धा रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे रस्त्यावर पालकांची वाहने, स्कूलव्हॅन आणि ऑटोचालकांमुळे सकाळी तसेच सायंकाळी दोन तास वाहतूक खोळंबते.

हेही वाचा – अकोला : आनंदवार्ता! हवाई प्रवासासाठी व्हा सज्ज; १९ आसनी विमान…

कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते, त्यामुळे पोलिसांनी शाळेच्या वेळेत गस्त घालावी. – अरुण बुरडकर, कारचालक

वाहतूक पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी ‘जॅमर’ वाहन तैनात आहे. शाळांसमोर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रयत्न करीत आहे. – जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in front of schools in nagpur the lives of students and parents are at risk adk 83 ssb
Show comments