यवतमाळ : नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात सरकारने अद्यापही ट्रकचालकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे यवतमाळ ट्रकचालक असोसिएशनने आज, बुधवारी सकाळी ११ वाजता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. शहराबाहेर हे आंदोलन सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली आहे.
हेही वाचा – विदर्भात हजारो ट्रक पुन्हा थांबले! ‘हिट ॲण्ड रन’विरोधात संप
केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानुसार दहा वर्षांची शिक्षा व मोठ्या दंडांची तरतूद आहे. शिवाय हा कायदा अजामिनपात्र आहे. या कठोर कायद्याविरोधात ट्रकचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गेल्या आठवड्यात आंदोलन केले होते. त्यावेळी पेट्रोलपंप बंद झाल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले होते. आजही ट्रकचालकांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने ट्रकचालक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. या आंदोलनाचा परिणाम माल वाहतुकीसह इंधन पुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या कायद्याने ट्रक मालकाला काहीही होणार नसून चालक मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकणार असल्याची भीती, येथे उपस्थित ट्रकचालकांनी व्यक्त केली.