शहरात एकमेव अधिकृत वाहनतळ
स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या नागपूर शहरातील धक्कादायक वास्तव म्हणजे, साडेतेरा लाख दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या या शहरात केवळ एकमेव अधिकृत वाहनतळ आहे. त्यामुळे पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होणाऱ्या ठिकाणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
महापालिकेने एल.अँड टी. रामबॉल इंजिनिअरिंग लिमिटेडकडून शहरातील वाहतुकीची पाहणी केली. शहरात वाहनतळ नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्ता रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम वाहतूक कोंडी होणे, वाहने संथगतीने चालवावी लागणे आदी प्रकार घडत आहेत. तेव्हा नवीन इमारतींमध्ये वाहनतळ विकसित करून वाहनतळांचे निकष कठोरपणे लागू करण्याची आवश्यकता आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी सुयोग्य वाहनतळ व्यवस्था करण्याची गरज आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
नागपूर सुधार प्रन्यासने सीताबर्डीवर एक वाहनतळ बांधलेला आहे. सेन्ट्रल अॅव्हेन्यूवर दोन वाहनतळ प्रस्तावित आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आली, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार म्हणाले. महापालिकेने जनता चौक ते व्हरायटी चौकादरम्यान उड्डाण पुलाच्या खाली ‘पे अँन्ड पार्क’ वाहनतळ आखून दिले आहेत. शहरात वाहनतळांचे अद्याप धोरण नसल्यामुळे खासगी वाहनतळांचा धंदा जोमात आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा सत्र न्यायालय, रुग्णालये, बाजारपेठा, मॉल परिसरातील वाहनतळ कंत्राटदारांच्या हवाली करण्यात आले आहेत. त्यामुळे कुठेही खासगी वाहनाने जाण्याचा बेत आखण्यापूर्वी वाहनतळाची व्यवस्था आहे काय, असा प्रश्न पडतो.
शहरात गणेशपेठ बसस्थानक परिसरात तीन, छत्रपती चौक, सोमलवाडा, भंडारा मार्ग आदी भागात खासगी वाहनतळे आहेत. वाहनतळ नसल्याने रेसिडन्सी रोड मार्गावर दोन्ही बाजूला चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे लिबर्टी चित्रपटगृहापासून राजभवनपर्यंत वाहतुकीची खोळंबा होत असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा