लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : चौकातील सिग्नलचे उल्लंघन केल्यास किंवा दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीने छायाचित्र काढतात. त्या छायाचित्राचा वापर करून ऑनलाईन चालान करतात. मात्र, वाहतूक पोलिसांना वाहनचालकांचे छायाचित्र काढण्याचा कोणताही अधिकार नसल्याची माहिती खुद्द वाहतूक पोलीस विभागानेच माहिती अधिकारात दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेले हजारो ऑनलाईन चालान अवैध समजायचे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलीस ‘पॉस डिवाईस’ने छायाचित्र घेऊन ऑनलाईन चालान करतात. गेल्या दोन वर्षांपासून वाहतूक पोलिसांचे छायाचित्र काढून ऑनलाईन चालान करण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, रस्त्यावर चालान पावती बूक हातात घेऊन दंड ठोठावणारा वाहतूक पोलीस आता पॉस मशिनचा वापर करायला लागला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलीस पॉस मशिन नसतानाही केवळ भ्रमणध्वनीने छायाचित्र काढून ऑनलाईन चालान करायला लागले होते. त्यामुळे दरवर्षी जवळपास ४ कोटी रुपयांचे ऑनलाईन चालान नागपूरकर भरत आहेत. तिलक खंगार या सामाजिक कार्यकर्त्याने नागपूर पोलीस विभागात माहितीचा अधिकार टाकला आणि ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीने छायाचित्र काढण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाद्वारे मान्यता आहे का?’, अशी माहिती विचारण्यात आली.

आणखी वाचा-भाजपच्या माजी खासदाराने ठोकला पक्षाला रामराम ; पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का

त्यावर लकडगंज वाहतूक परिमंडळाचे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी भ्रमणध्वनीने छायाचित्र काढण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता नसल्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत भ्रमणध्वनीचा वापर करून काढण्यात आलेले हजारो ऑनलाईन चालान अवैध असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांच्या उत्तरामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आता भ्रमणध्वनीने व्यक्तीचे छायाचित्र काढल्यास वाहतूक पोलिसांसोबत वाद-विवाद होऊ शकतात.

पॉस मशिनसाठी ७०० रुपये?

चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ऑनलाईन चालान करण्याची पॉस मशिन मिळविण्यासाठी ७०० रुपये पोलीस निरीक्षकाच्या ड्युटी रायटरला द्यावे लागतात. त्यानंतरच ऑनलाईन चालान करायला पॉस मशिन मिळते. हे सर्व पैसे रायटर जमा करून वरिष्ठांना देतो, अशी चर्चा होती. याबाबत पोलीस निरीक्षक वैरागडे यांना विचारणा केली असता त्यांनी पॉस मशिनसाठी पैसे घेत असल्याबाबत अफवा असल्याचे सांगितले.

” वाहनचालकाचे भ्रमणध्वनीने छायाचित्र काढून ऑनलाईन चालान करण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता नाही. परंतु, पॉस मशिन नादुरुस्त झाली किंवा कनेक्ट होण्यास अडचण असल्यास भ्रमणध्वनीवरूनही छायाचित्र काढून ऑनलाईन चालन करता येते. ” -संतोष वैरागडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लकडगंज वाहतूक शाखा)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police have no right to take photographs of motorists adk 83 mrj
Show comments