नागपूर शहरातील अनेक भागात पदपथांवर वाहन ठेवण्यात येतात तसेच विक्रेते अस्थायी दुकाने थाटून व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानावर येणारे ग्राहकसुद्धा रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहन कोंडी होते. ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘फुटपाथ फ्रिडम’ ही विशेष मोहीम उद्या, शुक्रवारपासून राबवण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या ‘चिरीमिरी’ घेण्याच्या स्वभावामुळे पदपथांवर दुकाने लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पदपथावर अस्थायी दुकान लावणाऱ्यांकडून वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे पथक मोठी वसुली करीत असतात. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपआयुक्त अर्चित चांडक यांनी ‘फुटपाथ फ्रिडम’ मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, उद्या शुक्रवारपासून वाहतूक पोलीस कारवाईचा धडाका सुरू करणार आहेत.
हेही वाचा >>>लैंगिक शोषण: विकृत मानसोपचार तज्ज्ञाच्या विरोधात आणखी एक तक्रार !
रहदारीच्या मुख्य मार्गावरील पदपथांवर वाहने ठेवली जातात. याच रस्त्यांवर अस्थायी दुकानदार व्यवसाय करतात. यामुळे येथे येणारे ग्राहकही आपली वाहने रस्त्यावरच ठेवतात. त्यामुळे पदपथ पूर्णत: बंद होते. परिणामी, पादचाऱ्यांना मुख्य मार्गाचा वापर करावा लागतो. अशावेळी अपघात होण्याच्याही घटना घडल्याचे समोर आले आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. त्यामुळे ‘फुटपाथ फ्रिडम’ मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली.
हेही वाचा >>>धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी साहित्य खरेदी: बावनकुळे काय म्हणाले?
टोईंग व्हॅन’ने उचणार वाहने
वाहतूक शाखेच्यावतीने पदपथावरील अवैधरित्या ‘पार्क’ केलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कलम १२२, १२७, १७७ प्रमाणे ‘टोईंग व्हॅन’द्वारे तसेच पदपथावरील अस्थायी दुकानदारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १०२, ११७ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, यापुढे ‘फुटपाथ फ्रिडम’ ही विशेष मोहीम राबवून अधिक प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांनी आपली वाहने फुटपाथवर पार्क न करता,पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावित. तसेच अस्थायी आस्थापना चालक (हॉकर्स) यांनी फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर किंवा रस्त्यालगत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे कृत्य करु नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.