नागपूर : शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक, रॉंग साईड वाहने, विना हेल्मेट दुचाकी चालविणारे, सिग्नल जम्प करणारी वाहने, वाहतूक कोंडी, चुकीच्या जागी पार्किंग केलेली वाहने किंवा वाहतुकीचे सर्रास उल्लंघन करणारे वाहनचालकांना बघून तुम्हाला राग येतो का? मग आता त्यावर वाहतूक पोलिसांनी तोडगा काढला आहे.
वाहतूक पोलिसांनी ‘ट्रॅफिक मित्र’ नावाने सेवा सुरु केली असून ८९७६८९७६९८ हा व्हॉट्सअप क्रमांक जारी केला आहे. या मोबाईलवर सामान्य नागरिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो पाठवू शकतात. वाहतूक पोलीस त्या वाहनांवर कारवाई करणार आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, सहआयुक्त निसार तांबोळी आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी नुकताच ‘ट्रॅफिक मित्र’ सेवा सुरु केली आहे. त्यासाठी ८९७६८९७६९८ हा व्हॉट्सअप क्रमांक सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी देण्यात आला आहे.
नागरिकांना वाहतूक पोलीस किंवा वाहतुकीशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास या क्रमांकावर मांडता येईल. रॉंग साईड धावणारी वाहने किंवा सिग्नल तोडणाऱ्या वाहनाचा फोटो काढायचा आणि ८९७६८९७६९८ हा व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा. त्यावर वाहतूक पोलीस निश्चितपणे कारवाई करणार आहेत.
कारवाई करण्यासाठी विशेष पथक
वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्यात एका पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ (सीओसी) येथे बसणार आहे. नागरिकांकडून तक्रार प्राप्त तक्रारीची सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहानिशा करतील. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्या वाहनांवर किंवा चालकावर कारवाई करण्याचे संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना निर्देश देतील.
चोवीस तासांत २०९ तक्रारी
वाहतूक पोलिसांनी ‘ट्रॅफिक मित्र’ सेवा सुरु करताच पहिल्याच दिवशी नागरिकांनी २०९ तक्रारी केल्या. त्यापैकी १५३ तक्रारींची पोलिसांनी पडताळणी करुन कारवाई केली. पार्किंग संदर्भात ३५ तक्रारी होत्या. त्यापैकी १७ तक्रारी सोडविण्यात आल्या. वाहतुकीसंदर्भात ८८ तक्रारी आल्या असून ६२ तक्रारींची सोडवणूक करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघनासंदर्भात ६५ तक्रारी आल्या आणि सर्वच तक्रारींवरुन कारवाई करण्यात आली. अतिक्रमण केल्याविषयी २१ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी ९ तक्रारींची सोडवणूक करण्यात आली. नागरिकांनी तक्रारी करताना व्यवस्थित फोटो, लोकेशन, पत्ता आणि वेळ टाकावे. जेणेकरुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करता येईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.