नागपूर : शहरात अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीस विविध उपक्रम राबवित आहेत. मात्र, वाहनचालक सुसाट असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वर्षभरात २२ हजार २४६ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ कोटी ५० लाख ४३ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला आहे. तरीही वाहनचालक ताळ्यावर आले नसून शहरात सर्रास अतिवेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वर्ष २०२४ मध्ये १ हजार २६० अपघात नागपूर शहरात झाले असून त्यामध्ये ३४८ जणांचा मृत्यू झाला. शहरात हत्याकांडातील मृत्यू दरापेक्षा अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, नागपूर पोलीस ‘जखम डोक्याला आणि पट्टी गुडघ्याला’ अशा स्थितीत आहेत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यातील विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. मात्र, हत्याकांडापेक्षा रस्ते अपघातात जवळपास चौपट मृत्यू दर असतानाही वाहतूक नियंत्रणावर भर दिल्या जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस दलात वाहतूक शाखेत जवळपास १२०० कर्मचाऱ्यांची गरज आहे.
दिवसेंदिवस रस्ते अपघातात वाढ होत असून त्यावर उपाययोजना काढण्याऐवजी वाहतूक पोलीस चालान कारवाई करण्यात आणि ‘वसुली’ करण्यात मग्न आहेत. नागपूर ग्रामीणमधील स्थिती शहरापेक्षा जास्त भयानक आहे. ग्रामीणमध्ये ९०५ रस्ते अपघात घडले असून ४१३ जणांचा अपघातात मृत्यू झाला. शहर आणि ग्रामीण भागात अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे सर्वाधिक अपघात घडले असून या अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. शहरात हेल्मेट न वापरणे, ‘सिग्नल जम्पींग’, सिटबेल्ट न वापरणे आणि ‘ओव्हरस्पीड’ने वाहन चालविल्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात मृत पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
वाहतूक पोलिसांचा वचक नसल्यामुळे वाहनचालक दंडाची भीती न बाळगता नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हिम्मत वाढत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत २२ हजार २४६ वाहनचालकांवर अतिवेगात वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करुन साडेचार कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही ‘धूम स्टाईल’ दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या वाढत असून वाहतूक पोलीस मात्र हतबल असल्याचे दिसत आहे.
कारवाई | चलान | दंडाची रक्कम |
हेल्मेट | ८,९२,८०३ | ७२,६८,२६००० |
सिग्नल जम्पींग | ६४, ५१४ | ४,०७,८०००० |
ओव्हरस्पीड | २२,२४६ | ४,५०,४३००० |
सिटबेल्ट | २५,७५६ | १,१४,९९००० |
कागदपत्र नसणे | ७३,६५३ | ४,६७,९५००० |
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक विभाग सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. वाहतूक नियमांचे पालन व्हावे म्हणून जनजागृती करण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. -माधुरी बाविस्कर (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.)