वर्धा : २१ नखी कासव, उलट्या बुऱ्याचा कोंबडा, मांडूळ साप, वाघाचे कातडे याची चर्चा व सरसकट आढळ आणि त्याची तस्करी समजमनात भिती पसरविणारे ठरत आहे. जादूटोण्याचे प्रकार व त्यात या प्राण्यांचे दुरुपयोग करण्याचे प्रकार पूर्वी घडले. तरीही आता हे प्रकार होत असल्याने केवळ वन विभाग नव्हे तर पोलीस खात्याने एक्टिव झाले पाहिजे, असा सूर आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव व जादूटोना विरोधी कायदा प्रचार समिती सदस्य गजेंद्र सुरकार यांनी राज्याच्या गृह विभागाकडे पाठपुरावा सूरू केल्याचे ते म्हणाले.
हे प्रकरण लोकसत्ताने चव्हाट्यावर आणले आणि अंधश्रद्धा निर्मूलन संघटना सतर्क झाल्या. पायाळू अपत्य हरविले कां किंवा महाराष्ट्रात मुलामुलींच्या हरविले असल्याच्या तक्रारी आहेत कां, ते शोधा. हे तपासण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्यातर्गत दक्षता अधिकारी म्हणून पोलीस ठाण्यात अधिकारी नेमल्या जातो. त्यांना असा काही संशय आला कां, आला असेल तर विना वारंट तपास किंवा जप्ती करता येते. जादूटोणा विरोधी कायद्यात दिलेल्या अधीकाराचा उपयोग करीत अश्या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज केले.
नरबळी देण्याचा प्रकार २०१४ मध्ये आर्वी नाका परिसरात घडला होता. गुप्तधन प्राप्त करणे, गावावरील संकट दूर करणे, दैवी शक्ती प्राप्त करण्याचे प्रकार दुर्मिळ प्राण्यांचा बळी देत होतात. धन शोधण्यासाठी पायाळू मुलांकडून लात मारल्या जाते. अश्या मुलांचा पत्ता नातेवाईक पैश्याच्या लोभपोटी देतात. अपहरण होते. अज्ञात स्थळी नेत त्यांची पूजा केली जाते. उपस्थित सर्वांना गुप्त धन हे पायाळू मुलांचे रक्त मागते, असे सांगितल्या जाते. हा अत्यंत अघोरी प्रकार अद्याप सूरू असल्याचे प्राणी तस्करी आरोपीकडून पुढे आला आहे. वन खाते हे अशी चौकशी करू शकत नाही. म्हणून आता दिलेल्या कायद्याच्या आधारे पोलीस विभागाने तत्पर भूमिका घ्यावी, अशी मागणी गजेंद्र सुरकार यांनी घेतली. गत ३५ वर्षात अशी अनेक प्रकरणे महाराष्ट्र अनिसने प्रकाशात आणली. हे नवे संकट दूर झाले पाहिजे म्हणून गृह विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले. तस्करी वाघाचे कातडे, मांडूळ व खवले मांजर याची झाली असली तरी अन्य प्राणी पण सावज असल्याचे सांगण्यात आले. या तस्करीचे जाळे आठ जिल्ह्यात पसरले असल्याची भिती अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. दरम्यान आज मांत्रिक मंडळी उपयोगात आणत असलेले व पकडल्या गेलेले खवले मांजर करुणाश्रमचे आशिष गोस्वामी व चमुने नैसर्गिक अधिवासात सोडले.