गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव जवळ भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळल्याने पाण्यात बुडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन भाविक सुरक्षित आहेत. जितेंद्र विमललाल जैन (वय ५२), प्रशांत नरेंद्र जैन (४४), आशिष अशोक जैन (४३) तिघेही रा. सतना (मध्यप्रदेश) असे या घटनेतील मृतकांची नावे आहे.
सालेकसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेल्या कारचा क्रमांक एम.पी. १९ सी.बी. ६५३२ आहे. सदर घटना रविवारी सकाळी ११:३० ते १२:०० वाजताच्या सुमारास घडली. सकाळी जैन संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे डोगरगढ प्रज्ञागिरी तीर्थक्षेत्र येथे निधन झाले. त्यांचेवर आज दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार होते. यात सहभागी होण्याकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील त्यांना मानणारे भाविक डोंगरगडकडे जाऊ लागले. असेच एका जैन कुटुंबिय संत शिरोमणी विद्यासागर यांच्या अंतिम दर्शन घेण्याकरिता जात असताना सालेकसा येथील पानगाव येथे या भाविकांची अनियंत्रित कार कठडे तोडून कालव्यात कोसळली. या अपघातात तीन भाविकांचा बुडून मृत्यू झाला. या कारमध्ये एकूण सहा भाविक होते. पैकी वर्धमान सिद्धार्थ जैन, अंशुल संतोष कुमार जैन, प्रशांत प्रसन्न जैन, हे तीन भाविक सुरक्षित आहे.
हेही वाचा…अमरावती-यवतमाळ मार्गावर भीषण अपघातात चार ठार, १० जखमी
घटनेची माहिती कळताच सालेकसा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतांना उत्तरीय तपासणीसाठी सालेकसा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. सदर कार ही कालव्यात कोसळली त्यापूर्वी ती अमर्याद वेगाने सालेकसाकडे जाणाऱ्या मार्गावर धावत होती, असे या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सालेकसा पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.