नागपूर : भावासोबत दुचाकीने परीक्षा केंद्रावर जात असलेल्या तरुणीचा ट्रकखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा भाऊ गंभीर आहे. ही दुर्दैवी घटना मनीषनगर-बेसा मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. यात ट्रक चालकाची कोणतीही चूक नसल्याचे प्रत्यक्षीदर्शींचे म्हणणे आहे. प्रियंका योगेश मानकर (२६) रा. पांजरा, कोराडी असे मृत तरुणीचे नाव आहे. जखमी भाऊ योगेश आवारे (२१) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंका बँकिंग परीक्षेची तयारी करीत होती. शनिवारी तिची परीक्षा होती. बेसा परिसरातील एम.के.संचेती शाळेत तिचे परीक्षा केंद्र होते. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्रियंका आणि योगेश एमएच-४०/सीआर-३४०३ क्रमांकाच्या दुचाकीने परीक्षा केंद्रावर जात होते. मनीषनगरातून बेसाकडे जाताना टिल्ट बिअर बारसमोर योगेशने पुढे जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान समोरून एक मालवाहू आले. निघण्याचा कोणताही मार्ग नसल्याने योगेशने जोरात ब्रेक दाबला. त्याचे वाहन घसरले आणि दोघेही डावीकडे पडले. ट्रकच्या मागच्या चाकात डोके आल्याने प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोक मदतीसाठी धावले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.

हेही वाचा…Shravan 2024: श्रावण मास, श्रावणी सोमवार आणि शिवामूठ…नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या…

बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी योगेशला तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात रवाना करण्यात आले. पंचनामा करून प्रियंकाच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अपघातामुळे जवळपास अर्धातास रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी तत्काळ सीसीटीव्ही तपासणीसाठी दोन कर्मचारी पाठविले. बेसा मार्गावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण कैद झाली आहे. फुटेजवरून ट्रक आणि दुचाकी अतिशय संत गतीने जात असताना योगेशने अचानक ब्रेक लावल्याने त्याची दुचाकी पडल्याचे दिसते. मात्र आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेजमध्ये अपघातात ट्रक चालकाची कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट दिसत होते. हा अपघात निष्काळजीपणे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाल्याची चर्चा होती.

हेल्मेटमुळे वाचला योगेशचा जीव

बहिणीला परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशिर झाल्यास परीक्षा देता येणार नाही, असे वाटत असल्यामुळे योगेश वेगात दुचाकी चालवत होता. एका ट्रकच्या मागे असल्यामुळे पुढे जाण्यास जागा मिळत नव्हती. त्यामुळे योगेशने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा निर्णय घेतला आणि तेथेच तो चुकला. ट्रकच्या समोर दुचाकी काढताच समोरून आणखी एक वाहन भरधाव येताना दिसले. त्यामुळे करकचून ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाला. प्रियंकाचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला तर योगेशच्या डोक्यात हेल्मेट होते, त्यामुळे तो थोडक्यात वाचला.

हेही वाचा…सावधान! राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये ३३ टक्के वाढ, मृत्यू तिप्पट; बृहन्मुंबईसह येथे सर्वाधिक रुग्ण…

शहरात रस्ते अपघाताची मालिका

गेल्या महिन्यापासून उपराजधानीत रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात शहरात १८ अपघात झाले आहेत. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी वसुलीवर भर देत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांवर नियंत्रण नसल्याची चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tragic accident in nagpur on manish nagar besa road young girl killed brother critical after truck collision adk 83 psg