अकोला : अकोला-वाशीम मार्गावर पातूरजवळ दोन भरधाव चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये चिमुकलीसह आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा समावेश आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
अकोला ते हैदराबाद चारपदरी मार्गावरील पातूर वळण मार्गावर जिल्ह्यातील पास्टूल येथील चारचाकी (क्र. एम एच ३० बीएल ९५५२) व दुसरी वाशीम येथील चारचाकी (क्र. एमएच ३७ व्ही ०५११) यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली. या मार्गाचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवून मार्ग एकेरी करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही चारचाकी वाहने समोरासमोर येऊन भीषण अपघात घडल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हेही वाचा…गडकरींची चिंता वाढली, नागपुरात हलबा समाजाचा कौल कोणाच्या बाजूने ?
दोन्ही वाहनांमधील प्रत्येकी तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील सरनाईक कुटुंब त्यांच्या चारचाकी वाहनाने वाशीमकडे निघाले होते. अपघातात रघुवीर अरुण सरनाईक (२८), अस्मिता अजिंक्य आमले (नऊ महिने), शिवानी अजिंक्य आमले (२०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (३५) रा.पास्टूल, शंकर इंगळे, सुमित इंगळे यांचा मृत्यू झाला, तर पीयूष देशमुख (११), स्वप्ना देशमुख (४१) व श्रेयस सिद्धार्थ इंगळे (३) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. गंभीर जखमींना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पातूर पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.