अकोला : विदर्भातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी राहते. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल असते. प्रवाशांची मागणी लक्षात घेता द्विसाप्ताहिक अमरावती-पुणे विशेष गाडीला सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला. पुणे-अमरावती व अमरावती-पुणे ०१४३९/०१४४० ही विशेष गाडी ३१ जुलैपर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता.
प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता त्या विशेष गाडीच्या आणखी १७ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. आता ही गाडी ३० सप्टेंबरपर्यंत धावेल. पुणे ते अमरावती दर शुक्रवार आणि रविवार रात्री १०.५० मिनिटांनी पुणे येथून सुटते. अमरावतीला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचते, तर अमरावती ते पुणे दर शनिवार आणि सोमवारी अमरावती येथून सायंकाळी ७.५० ला सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.२० वाजता पोहचते. या गाडीला बडनेरा, मूर्तीजापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, दौड आदी थांबे आहेत.