तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ८ जुलै २०१४ला या दोन्ही गाडय़ांची घोषणा केली होती. या गाडय़ा सुरू करण्यात पुढील मार्चची मुदत पाळण्यात आली नाही. शिवाय अर्थसंकल्पातील गाडी सुरू करण्यापूर्वी त्या गाडीला विशेष गाडी सोडण्याचा नवीन पायंडा रेल्वेने पाळला आहे. रेल्वे प्रवासी संघटनांच्या मते तर रेल्वे अर्थसंकल्पात घोषित गाडीचा अशाप्रकारे ‘ट्रायल रन’ घेणे चुकीचे आहे. रेल्वेमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून वेळापत्रकानुसार गाडी सुरू करायला हवी होती; परंतु या दोन्ही मार्गावर वेळापत्रकानुसार विशेष गाडी सोडण्याचा नवा प्रकार रेल्वेने सुरू केला आहे. साधारणत: ज्या मार्गावर वर्दळ वाढते, त्या मार्गावर विशेष गाडी सोडण्याची पद्धत आहे. हंगामी (विशेष) गाडी नियमित वेळापत्रकावर धावत नाही. अशा गाडय़ांच्या वेगळे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, रेल्वेने नागपूर- अमृतसर आणि नागपूर- पुणे वातानूकुलित या गाडय़ांना ‘विशेष दर्जा’ देऊन नियमित वेळापत्रकानुसार जानेवारी महिन्यात चार फेऱ्या सुरू केल्या आहेत. अर्थसंकल्पात घोषणा झालेली गाडी अशाप्रकारे हंगामी गाडी म्हणून चालविणे चुकीचे आहे, असे रेल्वे यात्री केंद्राचे बसंत शुक्ला म्हणाले. यासंदर्भात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, जानेवारी महिन्यात सोडण्यात येत असलेल्या नागपूर- पुणे आणि नागपूर- अमरावती वातानूकुलित साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली. शिवाय हे ‘ट्रायल रन’ नाही तर ती विशेष गाडी म्हणून सोडण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. मात्र, त्यांनी नियमित वेळापत्रकाच्या आधारावर विशेष गाडी सोडता येते काय, याबद्दल बोलण्याचे त्यांनी टाळले.
नागपूर- पुणे वातानूकुलित साप्ताहिक विशेष गाडी दर मंगळवारी १९.५० वाजता नागपुरातून सुटते आणि पुण्याला सकाळी ११.४५ वाजता पोहोचते. पुणे- नागपूर वातानूकुलित साप्ताहिक विशेष गाडी दर बुधवारी दुपारी १५.१५ वाजता पुण्याहून निघते आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.१५ वाजता येते. नागपूर- अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी नागपूर दर शनिवारी सायंकाळी १७.५० वाजता निघते आणि अमृतसरला दुसऱ्या दिवशी २१.०५ वाजता पोहचते. अमृतसर- नागपूर वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी दर सोमवारी पहाटे ४.२० वाजता अमृतसर येथून निघेल आणि नागपुरात दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता येईल.