बुलढाणा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो युवकांसाठी हि बातमी आहे. बातमी उपयुक्त असली तरी काहीशी डोकेदुखी वाढविणारी आहे.

लाखो युवक, युवती  सह शासकीय, निमशासकीय यंत्रणाची देखील डोकेदुखी याने वाढणार आहे. याचे कारण देखील मजेदार आहे. कधी कधी एखाद्या योजनेची  शासन घोषणा करते, घाईघीसडीत अंमलबाजवणी करते आणि काही महिन्यांनंतर त्यात बदल करते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचे मासलेवाईक उदाहरण ठरावे.  मागील वर्षीच्या अखेरीस पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी व निवडणूक आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी राज्य शासनाने  हि योजना जाहीर केली.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तेंव्हा सहा महिने…

या योजनेअंतर्गत उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी ६ महिने एवढा निश्चित करण्यात आला होता. मात्र आता राज्य सरकारचे शंभर दिवस झाल्यावर योजनेचा आढावा घेण्यात आला. यापरिणामी प्रशिक्षण कालावधी वाढविण्याय आला आहे. चालू  मार्च महिन्यात  काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार उमेदवारांचा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा पाच महिन्यांनी वाढविण्यात आला!  आता हा कालावधी एकूण ११ महिने करण्यात आला आहे.  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी याची पुष्टी केली आहे .

आता पुन्हा प्रशिक्षण

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक युवकांनी या योजने अंतर्गत  प्रशिक्षण घेतले आहे. राज्यातील हाच आकडा लाखो मध्ये असणार हे उघड आहे. सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या या युवकांना पुन्हा पाच महिण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.  शासन निर्णयानुसार युवकांनी ज्या  शासकिय, निम शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, महामंडळे तसेच विविध आस्थापनेमध्ये सहा महिने  कार्यप्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा प्रशिक्षणार्थी यांनी पुढील पाच महिन्याच्या कार्यप्रशिक्षण पुन्हा घ्यावे लागणार आहे. त्याना संबंधित आस्थापनेत ३० एप्रिल, २०२५ च्या आधी रुजू व्हावे लागणार आहे . सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून ५ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल. ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा प्रशिक्षणार्थींची नोंदणी करणे आवश्यक राहिल, असे स्पष्ट करण्यात आले आहे . जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यासंदर्भात येथे मार्गदर्शन करणार आहे.