अकोला : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कुंभमेळा होणार आहे. शाही स्नानांचे महत्त्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री हे आहेत. या कुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीव कुंभमेळ्याला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांसाठी आता रेल्वे धावून आली आहे.
विशेष गाड्या धावणार
प्रयागराज येथील कुंभमेळादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले. नांदेड-पाटणा आणि काचीगुड-पाटणादरम्यान विशेष गाड्या चालवणार आहेत. या रेल्वे गाड्यांचा पश्चिम विदर्भ व मराठवाड्यातील भाविकांना चांगलाच लाभ होईल. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कुंभमेळ्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन अकोला मार्गे दोन विशेष साड्या सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा…सोन्याच्या दरात २४ तासांत घसरण… चांदीने मात्र…
वेळापत्रक असे…
नांदेड ते पाटणा दरम्यान विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. विशेष गाडी क्रमांक ०७७२१ नांदेड येथून २२ जानेवारी रोजी २३.०० वाजला सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पाटणा येथे १०.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०७७२२ पाटणा येथून २४ जानेवारी रोजी १५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी नांदेड येथे ०४.३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटणी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा आणि दानापूर येथे थांबा राहणार आहे. दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १६ शयनयान श्रेणी, दोन सामान्य द्वितीय आणि दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी गाडी संरचना राहील.
हेही वाचा…टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा विक्रमच! आधी ३२०० किलोमीटर, आता ५०० किलोमीटर
काचीगुड- पाटणा विशेष गाडीच्या देखील दोन फेऱ्या होणार आहेत. ही विशेष गाडी क्रमांक ०७७२५ काचीगुडा येथून २५ जानेवारी रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पाटणा येथे १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७७२६ विशेष गाडी २७ जानेवारी रोजी पाटणा येथून ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी काचीगुडा येथे ७.०० वाजता पोहोचेल. या गाडीला निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, आणि दानापूर येथे थांबे राहणार आहेत. या गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, तीन सामान्य द्वितीय श्रेणी आणि एल एसएलआर अशी गाडी संरचना राहणार आहे.