गोंदिया : रेल्वे मार्गाच्या तिप्पटीकरणामुळे गाड्यांना वेग मिळेल, प्रवासी गाड्यांचा वक्तशीरपणा वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल. या उद्देशाने राजनांदगाव-नागपूर रेल्वे मार्गावरील तिसरी लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, यातील १८० कि.मी.चे काम लवकरच पूर्ण होणार आहे. याचा मुंबई – हावडा रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल कारण गाड्यांचा वेग वाढेल आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामांतर्गत दुर्ग-कळमणा तिसरा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवणे शक्य होणार असून प्रवासी रेल्वे सेवेत वाढ होण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सुरळीत व सुरक्षित रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तसेच वाहनांचा वेग वाढेल आणि वेळही वाचेल. या प्रकल्पाची अंदाजे किंमत ३४२५ कोटी रुपये आहे.

हेही वाचा – तक्रार करण्यासाठी अस्वल जेव्हा पोलीस ठाण्यात येते तेव्हा! पोलीस कर्मचाऱ्यांची बोबडी वळली, एकच पळापळ…

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागांतर्गत, दुर्ग ते कळमना विभागात अंदाजे ३४२५ कोटी रुपये खर्चाच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. राजनांदगाव-नागपूर एकूण २२८ कि.मी. पैकी आतापर्यंत एकूण १८० किलोमीटरचे काम पूर्ण केले गेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा-सालेकसा या
तिसरी लाईन वगळता (१०.०० किमी) उर्वरित सालेकसा-धानोली (७ कि.मी.), गुदमा-गंगाझरी (२४ कि.मी.) आणि कामठी-कळमणा (७ कि.मी.) या एकूण ३८ किमीच्या कामास वन व वन्यजीव विभागाची (वन्यजीव) मंजुरी मिळाली असून हे काम या आर्थिक वर्ष २०२४ -२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर दरेकसा-सालेकसा (१९ किमी.) तिसरी लाईन प्रकल्प २०२५-२६ पर्यंत पूर्ण होईल.

हेही वाचा – मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर भरदुपारी गोळीबार, चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील घटना; जखमी अवस्थेत…

यावेळी, ही सर्व कामे सुरक्षितता आणि रेल्वेच्या कामकाजात कमीत कमी व्यत्यय आणून वेगाने पूर्ण केली जात आहेत. तर कळमना- नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) ३ कि.मी. या आर्थिक वर्षात रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणही पूर्ण करण्यात येणार असून, सध्या दुर्ग-कळमणा हा विभाग पूर्णपणे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेने सुसज्ज झालेला आहे. देशाच्या प्रगतीबरोबरच दुर्ग-राजनांदगाव-कळमणा तिसरा रेल्वे मार्ग प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामांमुळे गाड्यांची संख्या वाढणार आहे. यामुळे संबंधित क्षेत्रांचा विकास, आर्थिक आणि औद्योगिक विकास आणि नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळेल अशी शक्यता आहे.