मुलं चोरीच्या अफवांचे लोण आता बुलढाण्यातही पसरले आहे. जळगाव जामोद नगरीत मुलं चोरीच्या संशयावरून एका तृतीयपंथीयाला अमानुष मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध जळगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यात मथुरेतील ४ साधूंना मुले चोरणारे समजून बेदम मारहाण करण्यात आली होती. याशिवाय, इतर अनेक राज्यातही अशाच घटना उघडकीस आल्या आहे.

हेही वाचा >>> भंडारा: चप्राड टेकडी मंदिर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार ; दोन श्वान केले फस्त

तृतीयपंथीयाने आपणास चॉकलेट देऊन हात धरल्याचे एका १२ वर्षीय मुलाने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. दरम्यान, तृतीयपंथी शेगावला जाण्याकरिता ऑटोमध्ये बसला. ऑटो जुन्या बस स्थानकाजवळ आला असता मुलाने तृतीयपंथीयाकडे अंगुलीनिर्देश केले. यावेळी काही नागरिकांनी कसलाही विचार न करता त्याला घेरून अमानुष मारहाण केली. यानंतर ऑटोत गुरासारखे कोंबून जळगाव पोलीस ठाण्यात नेले. तोपावेतो मुले चोरणाऱ्या टोळीची सदस्य पकडल्या गेल्याची माहिती पंचक्रोशीत वा-यासारखी पसरली. यामुळे पोलीस ठाणे परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. चौकशीअंती ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी ५ जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हे दाखल केले.