नागपूर : उपराजधानीत भरदिवसा तृतीयपंथींकडून गुंडागर्दी केली जात आहे. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत चार तृतीयपंथी एका वाढदिवस समारंभ असलेल्या घरात गेले. त्यांनी येथे १० हजार रुपये बक्षिसाची मागणी केली. कुटुंबीयांनी ५०० रुपये दिले असता त्यांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा ऊर्फ जोया लखन वर्मा (२५), तन्नू विजय मोरे (३४), ग्लोरी संध्या मल्हारी (२२) आणि ऑटोरिक्षा चालक असे चार आरोपींची नावे आहेत. तर कुणाल जागेश्वर मेश्राम (३२) रा. चिटणीस नगर, शिवसेना चौकजवळ, नागपूर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुणाल यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यांनी घराच्या अंगणात समारंभासाठी मंडप टाकला होता. मंडप बघून एका ऑटोरिक्षातून २९ जानेवारीला सकाळी ९ ते ११ वाजतादरम्यान तीन तृतीयपंथी त्यांच्या घरात गेले. त्यांनी कुटुंबीयांना मुलीच्या वाढदिवसानिमित्त तब्बल १० हजार रुपयांचे बक्षीस मागितले. कुणाल यांनी स्वखुशीने ५०० रुपये तृतीयपंथींना दिले. परंतु, तृतीयपंथींनी कुणाल यांच्या कुटुंबीयांशी वाद घालणे सुरू केले. कुणाल यांनी १० हजार रुपये देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यावर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत थेट लाथाबुक्कीने मारहाण सुरू केली. कुणाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा – नागपूर : खासदर औद्योगिक महोत्सवातील स्वच्छतागृहात महिलांचे आक्षेपार्ह चलचित्र, कला शिक्षकाने…

हेही वाचा – केंद्र-राज्यांच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत विसंगती

नागपूर पोलिसांच्या कारवाईचे काय?

नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अवैध वसुली करणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याअंतर्गत या टोळी वा एकटे तृतीयपंथी कुठल्याही कार्यक्रमात पैशाची मागणी करण्यास मनाई करण्यात आली होती. ट्रॅफिक जंक्शन, चौकात एकत्र येण्यास आणि वाहनचालक, प्रवाशांकडून पैसे मागण्यास मनाई करण्यात आली होती. आयोजकाने आमंत्रित केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. आदेशाचे उल्लंघन केल्यास नागपूर पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार होती. त्यानंतरही तृतीयपंथींकडून ही वसुली व लोकांना त्रास देणे सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transgender hooliganism in nagpur city mnb 82 ssb