लोकसत्ता टीम
नागपूर : नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवाराला ती देण्यात आली, त्या आकडेवारीत आणि २४ तासांनी प्रसिद्धीला दिलेल्या आकेडवारीत तफावत आहे. प्रारंभीच्या आकडेवारीत नागपुरात ३२ तृतीयपंथीयांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते तर नवीन यादीत ती संख्या घटून २८ वर आली आहे.
लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी शनिवारी जाहीर झाली. नागपुरात ५४.११ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्यात ३२ तृतीयपंथीयांनी मतदान केले होते . रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एकूण मतदान ५४.३० टक्के झाले असून त्यात तृतीयपंथीय मतदारांची संख्या २८ नमूद करण्यात आले आहे.
नागपूरमध्ये एकूण २२ लाख २३ हजार २८१ मतदार आहेत. त्यापैकी १२ लाख ७ हजार ३४४ मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख २८ हजार ६३६, महिला मतदार ५ लाख ७८ हजार ६८० आणि २८ तृतीय पंथीयांचा समावेश आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५४.९४ टक्के मतदान झाले होते.मतदान कमी होण्याची कारणे आता शोधली जात आहेत. नियमित मतदान करणाऱ्या मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात येणे, हेही एक कारण आहे. ‘एमटी’ श्रेणीतील मतदार ओळखपत्र असलेल्या हजारो मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याची बाब समोर आली आहे. हे जुने मतदार असून अनेक वर्षांपासून नियमित मतदान करीत आहेत. ते मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहींनी वडिलांच्या निधनाची नोंद केली होती.पण वडिलांसोबतच आईचेही नाव वगळण्यात आले. मेडिकल चौक पसिरात राहणाऱ्या एकाचे स्थानांतर झाल्याचे सांगून नाव वगळण्यात आले. जेव्हा की जन्मापासून तो व्यक्ती त्याच परिसराचा निवासी आहे. तसेच एका बुथवरील मतदाराचे नाव लांबवरच्या दुसऱ्या केंद्रात गेले. तसेच काही मतदार केंद्रावर अतिशय संथगतीने मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या सर्व कारणांमुळेही मतदान कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा-“देशात नवीन पुतिन…”, शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले…
महिला मतदार अधिक, मतदान मात्र कमी
दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि पश्चिममध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. मात्र, मतदानाच्या टक्केवारीत महिला मागे असल्याचे दिसून येते. दक्षिण-पश्चिममध्ये एकूण महिला मतदारांची संख्या १ लाख ८९ हजार १२९ एवढी आहे. त्यापैकी ९७ हजार ५१७ महिलांनी मतदान केले. दक्षिण नागपुरात १ लाख ८७ हजार ९७१ महिला मतदार आहेत. यातील ९७ हजार १९७ महिलांनी मतदान केले. पश्चिम नागपुरात १ लाख ८२ हजार ९३० महिला मतदार आहेत. त्यापैकी ९५ हजार ३८८ महिलांनी मतदान केले.
अंतिम टक्केवारी
दक्षिण-पश्चिम- ५२.९४ टक्के
दक्षिण- ५३.९५ टक्के
पूर्व- ५५.७८ टक्के
मध्य- ५४.०६ टक्के
पश्चिम- ५३.७३ टक्के
उत्तर- ५५.२० टक्के
एकूण- ५४.३० टक्के