नागपूर : ट्रान्सपोर्ट कंपनीतील एका लेखापालाने सहा महिन्यांत ४३ लाख ५४ हजार रुपये स्वत: आणि मित्रांच्या बँक खात्यांत जमा केले व फरार झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी लेखापालाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुरलीधर आसोपा (३८) रा. बिकानेर, राजस्थान असे आरोपीचे नाव आहे.
मनोज शवकानी (४८) यांची वाडी पोलिस ठाण्याअंतर्गत बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट या नावाने कंपनी आहे. कंपनीत सध्या दहा कामगार असून कंपनीच्या माध्यमातून ट्रकद्वारे व्यापार्यांचे साहित्य एका शहरातून दुसर्या शहरात पाठविले जाते. कामाचा व्याप मोठा असल्याने त्यांना लेखापालाची गरज होती. ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणार्या कर्मचार्याने त्याचा मेहुणा मुरलीधर याला लेखापाल म्हणून येथे काम मिळवून दिले. मुरलीधर हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. जून २०२२ मध्ये तो कंपनीत कामाला आला. कर्मचाऱ्याचाच मेहुणा असल्याने विश्वास ठेवून त्याच्यावर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सोपविण्यात आली.
हेही वाचा >>> मध्यप्रदेशात वाढतो आहे, वाघांच्या मृत्यूचा आकडा, हा रेल्वे ट्रॅक …
आरोपी हा कर्मचाऱ्यांचे पगार, वाहनांत डिझेल भरणे, इतर साहित्य खरेदी व आलेल्या रकमेच्या नोंदी ठेवत होता. दिवसभरात आलेली रक्कम त्याने कंपनीच्या बँक खात्यात जमा करायला पाहिजे होती. मात्र, त्याने स्वत:च्या आणि मित्रांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यांत रक्कम जमा केली. अशा पद्धतीने नोव्हेंबर २०२२ पर्यंत म्हणजे केवळ ६ महिन्यांत त्याने ४३ लाख ५४ हजारांची रक्कम वळती केली. फिर्यादी केवळ कच्च्या नोंदी पाहायचे. मुळे आरोपीवर कधी संशय घेण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. त्याने सहा ते आठ बँक खात्यांत रक्कम जमा केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन देखील तो टाळाटाळ करीत होता तसेच पोलिसांत गेल्यास जिवे मारण्याची धमकीदेखील दिली. त्यामुळे फिर्यादीने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> पालकमंत्री बेपत्ता! थेट पोलीस ठाण्यात तक्रार; कुठे घडला हा प्रकार? वाचा…
असे फुटले बिंग
मुरलीधर दिवाळीनिमित्त बिकानेरला घरी गेला. दिवाळीनंतरही तो कामावर परतला नाही. फिर्यादीने फोन करून त्याला कामावर बोलाविले. मात्र, त्याने स्पष्ट नकार दिला. दरम्यान फिर्यादीने नवीन लेखापालाची नियुक्ती केली. कच्च्या नोंदी तपासत असताना घोळ लक्षात आला. सहा महिन्यांचा संपूर्ण आर्थिक व्यवहार तपासला असता हे प्रकरण उघडकीस आले.
जिवे मारण्याची धमकी
आर्थिक फसवणूक लक्षात आल्यावर फिर्यादीने मुरलीधरशी संपर्क साधला. सुरुवातीला त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. फिर्यादी स्वत: त्याच्या गावी गेले आणि रक्कम परत करण्याची विनंती केली. त्याने रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, दीड वर्ष लोटल्यानंतरही तो पैसे परत करीत नव्हता. एवढेच काय तर फिर्यादीला जिवे मारण्याचीही धमकीही त्याने दिली.