महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या परिवहन खात्याने १५ जानेवारीपासून राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत १३ जानेवारीला आदेश काढले. शनिवार, रविवारी सुट्टीमुळे या अभियानासाठी नवीन जनजागृती पत्रक छापण्यासह इतरही काही सोयी बऱ्याच कार्यालयांना करता आल्या नाहीत. काही जिल्ह्यांत नाममात्र उद्घाटन झाले, तर काहींनी नंतरच्या दिवसांत उद्घाटनाचे नियोजन केले आहे.
रस्ते अपघात कमी व्हावे, रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती व्हावी म्हणून केंद्र सरकारने १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील परिवहन खात्याने अभियानाबाबत आधीच सगळ्या आरटीओंना सूचना देणे अपेक्षित होते. परंतु, १५ जानेवारीपासून राबवायच्या उपक्रमाचे १३ जानेवारीला आदेश काढले गेले. आदेश काढलेल्या दिवसादरम्यान शनिवार- रविवार सुट्टी आल्याने अचानक १५ जानेवारीपासून कार्यक्रम घेण्याबात आरटीओ अधिकाऱ्यांची दमछाक झाली. अनेक आरटीओ कार्यालयांना अभियानाच्या जनजागृतीसाठीचे पत्रक छापता आले नाही, तर काहींना १५ जानेवारीला उद्घाटन कार्यक्रमही घेता आले नाही. उद्घाटन घेतलेल्या कार्यालयांनी जुन्या प्रसिद्धी साहित्यांच्या जोरावर थातूरमातूर सोपस्कार केले. तर काहींनी येत्या एक-दोन दिवसानंतर उद्घाटनाचे नियोजन केले.
आणखी वाचा-वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवसांत तिसरा बळी
या उपक्रमासाठी परिवहन खात्याला पोलीस विभाग, वाहतूक पोलीस शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सेवाभावी संस्था, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वाहन विक्रेते, पीयूसी सेंटर्स, वाहन उत्पादक कंपनी, विमा कंपन्यांनाही सोबत घ्यायचे आहे. परंतु, ऐन वेळेवर आदेश काढल्याने समन्वय झाला नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
केंद्राकडून १० जानेवारीला सूचना मिळताच सगळ्या आरटीओ कार्यालयांना रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सूचना दिल्या. १५ जानेवारीला मुंबईत मोठा कार्यक्रम झाला. त्यामुळे या दिवशी स्थानिक कार्यालयात कार्यक्रम झाला नसल्यास एक-दोन दिवस मागे पुढे होईल. -विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.