वर्धा : दारूबंदी असली तरी अवैध दारूविक्री कधीच बंद होत नसल्याचा सार्वत्रिक अनुभव. मात्र अड्डे ठरलेले तसेच किरकोळ विक्रेते माहीत असल्याने पोलीसांचे छापे हमखास पडतात. पण आपल्या दुचाकीवरून दारू विक्री करीत अर्थार्जनाचा मार्ग महिलांनी शोधल्याचे प्रकरण धक्का देणारे ठरले आहे.
पिपरी येथील एका महिलेने तिच्या मोपेडमध्ये विक्रीसाठी दारू आणल्याची माहिती मिळाली. ‘ती’ची व तिचा सहकारी अक्षय घोंगडे यांच्या दुचाकीतून विविध कंपनीची दारू तसेच बिअर जप्त करण्यात आली. एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामनगर पोलीस आता चौकशी करीत आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी नेमलेल्या सचिन इंगोले यांच्या चमूने ही कारवाई केली आहे. मोपेड गाडीचा दारू वाहतुकीसाठी महिलेने उपयोग करण्याची ही पहिलीच बाब ठरली आहे.