नागपूर: चामोर्शीवरुन प्रवासी घेऊन निघालेल्या भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाचे भिवापूरजवळील मानोरा फाट्याजवळ नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गालगत खोदलेल्या २५ फूट नाल्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, ट्रॅव्हल्समधील ३२ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले.
सर्व जखमी प्रवाशांना भिवापूर व उमरेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील मानोरा फाटा परिसरात झाला. या अपघाताच्या ठिकाणी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अकरा वाजता बाबा नामक ट्रॅव्हल्स क्र. (एम.एच. ३७ बी. ६९६४) ही चामोर्शीवरून नागपूरकडे निघाली. भिवापूर बसस्थानकावरून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात असताना राष्ट्रीय मार्गावरील मानोरा फाटा परिसरात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव ट्रॅव्हल्स थेट २५ फूट खोल नाल्यात कोसळली.
सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान याच मार्गाने उमरेडकडे जात असलेले माजी आ. सुधीर पारवे यांना अपघातग्रस्त वाहन दिसले. त्यांनी लगेच कार थांबवली आणि जखमींना मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी लगेच ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांना अपघाताची माहिती दिली. ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळली असल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली.
सर्व जखमींना शासकीय रूग्णवाहीका व खाजगी वाहनांनी भिवापूर व उमरेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. येथे परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन, ठाणेदार जयप्रकाश निर्मल, नायब तहसीलदार संजय राठोड आदी उपस्थित होते. जखमींची चौकशी करण्यात येत असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रॅव्हल्सचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
७ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक
ट्रॅव्हल्समधील ३२ पैकी ७ प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील मेडीकल रुग्मणालयात हलविण्यात आले आहे. नागपुरात उपचार घेत असलेल्या जखमींची नावे पोलिसांनी अद्याप दिली नाही. जखमींसोबत पोलीस उपनिरीक्षक आकाश महाकाळ हे उपस्थित असून पुढील तपास करीत आहेत. या अपघातामुळे राष्ट्रीय मार्गाच्या दुतर्फा एक किमी पर्यंत वाहतूक प्रभावित झालेली होती. वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तासभर मेहनत करुन वाहतूक कोंडी फोडली. सध्या वाहतूक सुरळीत आहे.