बुलढाणा : मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज, शनिवारी दोन खाजगी बसमध्ये झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.