|| राखी चव्हाण
मनुष्यबळाअभावी महापालिकेचे दुर्लक्ष
वाहतुकीत अडथळा येऊ नये आणि दुर्घटना होऊ नये म्हणून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या जाणे गैर नाही, पण त्याचाच आधार घेत सर्रासपणे झाडांच्या फांद्या छाटण्याचा प्रकार संपूर्ण शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे, शहरातील प्रतापनगरात गेल्या तीन महिन्यात किमान दोन वेळा तरी झाडांच्या फांद्या सर्रासपणे छाटण्याचा प्रकार घडला. मात्र, मनुष्यबळाअभावी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अवैध फांद्याच्या छाटणीकडे लक्ष नाही.
शहरातील हिरवळ आणि पर्यावरणावर केवळ झाडांच्या छाटणीचाच परिणाम होत नाही तर झाडांच्या कापल्या जाणाऱ्या फांद्या देखील तेवढय़ाच परिणामकारक ठरतात. मात्र, पावसाळा तोंडावर आल्याचे तसेच जीविताला आणि मालमत्तेस धोकादायक असल्याचे सांगत झाडांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली शहरातील अनेक झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. विजेच्या तारांना अडथळा होत असेल तर झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी महावितरण किंवा महापारेषणला आहे. त्यांना परवानगीची गरज नाही. कारण झाडांच्या फांद्यांमुळे शॉर्टसर्किट किंवा वीज ट्रीप होण्याची भीती असते. केवळ त्यांना उद्यान विभागाला सूचित करावे लागते. मात्र, वारंवार एकच काम करावे लागू नये म्हणून गरजेपेक्षा अधिक फांद्या कापण्याचा प्रकार देखील महावितरण व महापारेषणकडून घडलेला आहे.
सीए रोड वर्धमाननगर, ग्रेट नाग रोड, बैद्यनाथ चौक, उमरेड रोडवरील वकीलपेठ परिसर, रेशीमबाग चौक, गुरुदेवनगर, विश्वकर्मानगर या परिसरात झाडांच्या फांद्या अशा पद्धतीने कापण्यात आल्या की ते झाड पुन्हा उभेच राहू शकणार नाही. या शहराची ओळखच मुळात हिरवळीसाठी आहे, पण फांद्यांच्या नावाखाली झाडे कापणाऱ्यांवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. प्रतापनगर ते माटे चौक हा मार्ग जणू झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी नेमून दिला आहे, अशा पद्धतीने या मार्गावर नेहमीच झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. मात्र, महापालिकेच्या उद्यान अधीक्षकालाच या प्रकाराची माहिती नसल्याचे समोर आले. झाडांच्या फांद्या खूप वाकलेल्या होत्या. वाहनांवर त्या पडण्याची शक्यता होती. धोकादायक होते, अशी हजारो कारणे दाखवून शहरात अंदाधूंदपणे झाडांच्या फांद्या कापल्या जातात. मात्र, या प्रकारापासून महापालिकेचा उद्यान विभाग अनभिज्ञ आहे. लोकांना एकतर वृक्षतोड अधिनियम माहिती नाही आणि माहिती असेल तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातच्या गल्लीबोळातून झाडे कापायची आहेत का, फांद्या कापायच्या आहेत का, असे विचारणारे अनेक माणसे सायकलवर फिरतात. त्यांच्याकडूनही विनापरवाना झाडे आणि त्यांच्या फांद्या कापून घेतल्या जातात. गेल्या चार वर्षांत शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते, चिंचभवन उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात फांद्या छाटण्याच्या नावाखाली अनेक वृक्षांचा बळी गेला.
‘‘प्रतापनगर ते माटे चौक मार्गावर वीजतारांसाठी झाडांच्या फांद्या कापल्या गेल्या असतील. मात्र, वीजतारा नसतानाही जर त्या फांद्या कापल्या गेल्या असतील, तर त्याविषयीची माहिती नाही. कारण त्यासाठीचे परवानगी मागणारा अर्ज आमच्याकडे आलेला नाही. तरीही या प्रकरणाची माहिती घेतली जाईल, असे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार यांनी सांगितले.’’ ‘‘फांदी कापण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागात एका फांदीमागे ५०० रुपये भरावे लागतात. परवानगीचे अधिकार पालिका आयुक्तांना आहे. नवीन नियमानुसार २५ झाडांसाठीची परवानगी ते देऊ शकतात, अशी माहिती माजी उद्यान अधीक्षक व सल्लागार सुधीर माटे यांनी दिली.
‘‘अधिकाधिक लाकूड मिळवण्याच्या प्रयत्नात झाडांचा बळी घेतला जात आहे. महावितरण किंवा महापारेषण फांद्या कापतात, पण त्या किती कापल्या जातात, यावर लक्ष दिले जात नाही. झाडांना इजा न पोहोचवता त्याच्या फांद्या कापल्या गेल्या पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई व्हायला पाहिजे. अंदाधूंद फांद्या कापल्या गेल्याने झाडांचे संतुलन बिघडते आणि वादळात तो वृक्ष कोलमडून पडतो. महापालिकेच्या उद्यान विभागाला अनेकदा याची माहिती दिली, पण पुढच्या कारवाईचे काय? हे कळूच शकले नाही.’’ – कौस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन विजिल फाऊंडेशन