बुलढाणा : जिल्ह्याच्या सीमेवरील आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्याचा फटका बसला. यामुळे मोठ्या संख्येने झाडे, विद्युत खांब जमीनदोस्त झाले. काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली असून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला. राज्य महामार्ग पातुर्डा येथील मुख्य रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे झाडे व १६ विद्युत खांबे उन्मळून पडली. पातुर्डा गाव व देऊळगाव, कवठळ व एकलारा बानोदा परिसरातील ८ गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा परिसरात संध्याकाळी उशिरा आभाळ दाटून आले. विजेच्या गर्जना आणि वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस सुरू झाला.

हेही वाचा >>> सावधान! पाणी नसल्याने वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव; रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

सुसाट वादळी वाऱ्यामुळे पातुर्डा गावकडे जाणाऱ्या राज्यमार्ग २७८ वर रस्त्यालगत असलेली झाडे उन्मळून पडली. परिणामी प्रवासी वाहतूक प्रभावीत झाली, अनेक ठिकाणी एक तास वाहतूक ठप्प पडल्याचे वृत्त आहे. आंबा व लिंबाची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पातुर्डा गावठाण परिसरात ३ विद्युत खांब वाकडे झाले, देऊळगाव येथील ४ खांबे पडली, एकलारा बानोदा येथे १ विद्युत खांबवर झाड उन्मळून पडले. दुसरीकडे, एकलारा बानोदा परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. याशिवाय ११ केव्ही गावठाण कवठळवर १७ विद्युत खाबावरिल तारा तुटल्या. ७ विद्युत खांब तुटले, ३३ केव्हीवरिल ६ खांबांचे वायर तुटले. या तारा दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. विद्युत पुरवठा पुर्वरत सुरू करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात असल्याची माहिती विद्युत वितरण कार्यालयाकडून देण्यात आली. वादळी वाऱ्यामुळे झाडे विद्युत खांबावर उन्मळून पडल्याने विद्युत पोल व तार तुटून पडली. विद्युत खंडित झालेल्या गावातील विद्युत पुरवठा पुर्वरत सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे चित्र आहे.

Story img Loader