बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यातही जिल्ह्याचे कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे.पावसाच्या, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशी परिस्थिती असल्याने शेती आता अतिशय जोखमीचा व्यवसाय झाला आहे. त्यातच सिंचन करणाऱ्या धरणाची स्थिति नियमित डागडुजीअभावी बिकट झाली आहे.
बुलढाणा तालुक्यातील मासरूळ ,शेकापूर ,करडी सह जिल्ह्यातील बहुतांश धरणांवर भिंती लगत झाडाझूडपांची संख्या वाढली असून भिंतीवर छोटे जंगलच निर्माण झाल्याचे गंभीर चित्र आहे. मासरुळ, शेकापूर, करडीसह जिल्ह्यातील बहुतांश धरणांची अवस्था सारखीच आहे. याप्रसंगी या अनेक ठिकाणी होत असलेली पाणी गळती किंवा याच झाडाझूडांमुळे धरण फुटीच्या घटना गतकाळात जिल्ह्यात घडल्याची माहिती त्यांनी दिली. त्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला पूर्णतः मिळालेला नसल्याचेही सांगितले. यासाठी अनेक शेतकरी जिल्हा मुख्यालयाच्या कार्यालयाची उंबरठे झिजवत असतात.
संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे, झुडपे वाढली आहे. परिणामी, प्रकल्पाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाणी गळती होऊन नुकसान देखील सहन करावे लागते. मौजे मासरूळ, शेकापुर, करडी धरणासह बुलडाणा जिल्ह्यातील बहुतेक धरणाच्या भिंतीवर अनावश्यक झाडेझुडे वाढलेली आहे. यामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते. पावसाळ्यात धरण फुटण्याचीही संभाव्य शक्यता आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा प्रमुख यांनी आज सोमवारी, १७ फेब्रूवारी रोजी या गंभीर व धोकादायक प्रकाराकडे प्रसिद्धिमाध्यम आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे. अनावश्यक झाडे काढून होणारी गळती थांबवावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केली आहे.या संदर्भात त्यानी करड़ी, शेकापुर भागातील शेतकरी आणि पदाधिकारी यांच्या शिष्टमंडलासह जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची आज भेट घेऊन चर्चा केली व संभाव्य धोक्याकडे लक्ष वेधले.
धरणांच्या भिंतीवर असलेली ही झाडे त्वरित काढण्यात यावी, अशी आग्रही मागणी जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना केली आहे. ही अनावश्यक झाडी काढून होणारी पाण्याची गळती न थांबवल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.