लोकसत्ता टीम
यवतमाळ: यवतमाळ शहरात विविध चौकांच्या सुशोभिकरणाकरिता गेल्या काही दिवसांत विविध आकर्षक शिल्प (पुतळे) उभारण्याचा ट्रेंड आला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर परिषदेने अनेक शिल्प, पुतळे शहरात लावले. मात्र एक पुतळा गेल्या वर्षभरापासून नगर परिषद इमारतीच्या आवारात धुळखात पडला होता. सर्वसामान्य माणसांसारखाच तोही आपल्यावरील अन्याय मुकपणे सहन करत होता. पण त्याची त्या बंदिवासातून सुटका झाली आणि हा पुतळा नजरेस पडले तेव्हा सर्वसामान्य माणसंही अवाक झाले. कारण तो पुतळा होता, आ.के. लक्षमण यांनी साकारलेला व सर्वसामान्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या ‘कॉमनमॅन’चा!
आणखी वाचा-…अन् जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला झाडू, वाचा कारण काय ते…
शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते नुकतेच नगरपरिषदेत पूरग्रस्तांच्या समस्या घेऊन गेले. तेव्हा त्यांना नगर परिषदेच्या तळघरात गेल्या एक वर्षापासून प्लास्टिकने झाकून असलेला ‘कॉमनमॅन’चा पुतळा दृष्टीस पडला. या पुतळ्याचे लोकार्पण होवूनही तो लावण्यासाठी योग्य जागा न मिळाल्याने हा पुतळा प्रशासनाने गुंडाळून ठेवला. ही बाब निदर्शनास येताच नारी रक्षा समितीचे विनोद दोंदल, चेतना राऊत, राहुल दाभाडकर, निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अर्पित शेरेकर, किशोर बाभूळकर, ईश्वर येरके आदींनी या पुतळ्यास प्लास्टिकमधून मुक्त केले. नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफसफाई करून हा ‘कॉमनमॅन’ शहरातील सर्वसामान्यांना बघता येईल, अशा ठिकाणी ठेवला. नगर परिषद प्रशासनाने सर्वसामान्य जनतेचे धूळखात असलेले प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.