बुलढाणा: जागावाटप व उमेदवारीचा गुंता यामुळे रखडलेल्या महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा अखेर झाली. यामुळे यंदा गल्ली ते दिल्ली गाजलेल्या बुलढाणा लढतीचे चित्र बव्हंशी स्पष्ट झाले आहे. यंदाही लढत रोमहर्षक होणार हे निश्चित असले तरी युती व आघाडीला नाराजींच्या कडव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
सलग तीन विजय मिळविणारे शिंदे गटाचे म्होरके प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी, २८ मार्चला झाली. यामुळे दिल्लीश्वर भाजप श्रेष्टी त्यांना हिरवी झेंडी देण्यास किती प्रतिकूल होती हे स्पष्ट होते. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बुलढाणा लढण्याची पक्की तयारी केली होती. घर घर चलो अभियानात त्यांनी मतदारसंघाच्या काना कोपऱ्यात चितारलेले कमळ पुसण्यास यंत्रणांचा लाखोंचा खर्च लागला असेल अशी चर्चा आहे.
हेही वाचा…नितीन गडकरींची संपत्ती किती? जाणून घ्या फौजदारी प्रकरणे, कर्ज अन्…
मात्र त्यात गंमत कमी आणि सत्य जास्त हे वास्तव आहे. यामुळे भाजपाच्या विजयाची ‘गॅरंटी’ असलेला बुलढाणा शिंदे गटाला देताना ‘महा शक्ती’ ला झालेल्या वेदनांची कल्पना त्यांनाच समजू शकते. चौथ्यांदा विजयाचे मनसुबे आखणाऱ्या जाधवांसमोर ‘मोठ्या भाऊ’ महा नाराजी हे मोठे आव्हान आहे. बुलढाणा गमविण्यात भाजपमधील अंतर्गत छुपी गटबाजी हे देखील महत्वाचे कारण असल्याची चर्चा आता रंगली आहे. यामुळे ‘चिखली’ला संधी मिळण्याची शक्यता दिसताच घाटा खालच्या प्रभावी नेत्याने जाधवांच्या पारड्यात वजन टाकले. यामुळे दुसरा गट नाराज झाला. यात भाजपच्या मूळच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीची भर पडली आहे.