अमरावती : शुक्रवारी १४ मार्च रोजी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. देशभरात वेगवेगळया भागात हा रंगोत्सव साजरा केला जाईल. याप्रमाणेच होळी साजरी करण्याची एक पद्धत सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात अस्तित्वात आहे. सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना कात्री लावून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. पूर्वापार शिरस्ता व रितींचा यात समावेश असतो.
पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिका पूजन केले जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात. गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारल्या जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत आहे. त्याची पूजा केली जाते. आदिवासी लोक त्यांना ‘मेघनाथ बाबा’ म्हणतात. ज्या भागात मेघनाथ पूजा असते, त्या ठिकाणी होळीचा आगळावेगळा सोहळा पाहायला मिळतो. ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करीत असतात. होळीनिमित्त मेळघाटातील काही गावामध्ये मोठ्या यात्रादेखील भरत असतात.
होळी कशी साजरी करतात
अनेक गावांमध्ये छोटी व मोठी अशी दोन प्रकारची होळी पेटविली जाते. यासाठी जंगलातून आणलेले हिरवे बांबू उभारण्यात येतात. होळी पेटल्यानंतर लहान मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. होलिकादहनामुळे वर्षभर आनंद व सुखाचे वातावरण राहते, अशी आदिवासींची श्रद्धा आहे. सलग पाच दिवस आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. विविध कार्यक्रम व रंगांची उधळण करण्यासोबत निसर्गाच्या आराधनेला महत्त्व देत असतात. आदिवासी एकमेकांमधील हेवेदावे, भेदभाव विसरून या दिवशी एकत्र येत असतात. मुला-मुलींचे लग्नदेखील जोडले जातात. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी श्रद्धेने नवस देखील बोलतात आणी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडायला या ठिकाणी येतात. सायंकाळी होळी पेटविल्यानंतर त्यात नवसाचे नारळ चढविले जातात. या उत्सवात सहभागी होण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
फगवा मागण्याची प्रथा
होळी दरम्यान मेळघाटात येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींकडून फगवा अर्थात पैसे मागण्याची प्रथा आहे. मेळघाटच्या बाहेरुन येणारी वाहने अडवून वाहनासमोर आदिवासी बांधव नाचून आणि गाणी म्हणून फगवा मागतात. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फगवा द्यावाच लागतो. गावातून जाणारा रस्ता दोर बांधून अडवला जातो. रस्ता बंद असल्याने वाहन थांबताच वाहनातील लोकांना पैसे मागितले जातात. पैसे घेऊन आदिवासी बांधव रस्ता मोकळा करून देतात. अनेकदा मेळघाट बाहेरून येणारे काही लोक फगव्यासाठी रस्त्यावर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत नृत्यात सहभागी होऊन मेळघाटातील होळी आणि फगवाचा आनंद लुटतात.