अमरावती : पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आणि १२ मार्च रोजी ‘फगवा महोत्सवा’चे आयोजन मेळघाटातील धारणी तालुक्यातील मौजे कोठा येथील ग्रामज्ञानपीठ संपूर्ण बांबू केंद्र येथे करण्यात आले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते ११ मार्च रोजी दुपारी २ वाजता महोत्सवाचा प्रारंभ होईल. आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता समारोप होईल. मेळघाटात होळी सणाचे महत्व मोठे आहे. कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेला आदिवासी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती होळी साजरी करण्यास मेळघाटात परत येतो.
हेही वाचा >>> अमरावती : सावधान..! रेल्वेत नोकरीचे आमिष, ४९.६५ लाखांनी फसवणूक
होळी व घुंगरु बाजार आदिवासी समाजाचे महत्त्वाचा उत्सव आहेत. पारंपरिक वेशभूषा करुन आलेले आदिवासी बांधव, पारंपरिक नृत्य सादर करतानाचे दृश्य विलोभनीय असते. फगवा महोत्सवाच्या निमित्ताने मेळघाटातील आदिवासी संस्कृतीचे सौंदर्य जगासमोर आणणे हा उद्देश आहे.
संपूर्ण बांबू केंद्रांतर्गत ग्राम ज्ञानपीठ परिसरात आदिवासी बांधवांच्या मदतीने बांबूच्या वस्तुंचे प्रदर्शन तथा बांबूच्या वस्तू बनविण्याची प्रात्यक्षिके, आदिवासी बांधवांच्या नृत्य स्पर्धा, कोरकू संस्कृती दर्शन, नैसर्गिक रंग तयार करण्याची प्रात्यक्षिके, जंगल भ्रमण, जंगल सफारी असे अनेक ठळक उपक्रम आयोजित केलेले जातात.
हेही वाचा >>> समृद्धी महामार्गावर इराळा येथे भरधाव कंटेनरचा अपघात
मेळघाटमध्ये होळीपासून ५ दिवसांनी रंगपंचमी साजरी होते. मेळघाटच्या वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या दिवशी होळी असते. स्त्री, पुरुष, बालके, युवक व युवती यांचे गट विविध प्रकारचे नृत्य व गीत मोठ्या उत्साहात सादर करतात. ‘फगवा महोत्सवा’त आदिवासी नृत्यप्रकार, विविध चर्चासत्रे व कार्यशाळेद्वारे सखोल मंथन, कोरकू संस्कृतीदर्शक प्रदर्शन, जंगलातील चित्तथरारक किस्से, जंगलभ्रमण, आदिवासी रुढी परंपरांविषयी रंजक माहिती, आदिवासी समाजाची प्रामाणिकता, गाव पंचायत आणि तेथील निर्णय असा माहितीचा खजिना यानिमित्ताने पाहुणे मंडळींना ऐकायला व अनुभवायला मिळणार आहे. आदिवासी समाजातील विविध परंपरा, त्यांची निसर्गपूरक जीवनशैली, त्यांची परंपरागत ज्ञानसंपदा प्रत्यक्ष अनुभवायला फगवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात येत आहे.