यवतमाळ : आदिवासी समाजातील पालकांचा मुलांना शासकीय आदिवासी आश्रमशाळेत टाकण्याकडे कल वाढावा, यासाठी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या पुढाकारातून आदिवासी समाज आणि आदिवासी विभागातील दरी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याच अनुषंगाने आज शुक्रवारी राज्यातील ४९७ आदिवासी आश्रमशाळेत एकाचवेळी मुक्काम करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदिवासी विकास विभाग अधिक लोकाभिमुख व्हावा या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी राज्यात आदिवासी विकास प्रकल्पाद्वरे संचालित आश्रमशाळेत मुक्काम करण्याची संकल्पना अधिकाऱ्यांसमोर काही दिवसांपूर्वी मांडली. ही संकल्पना आज शुक्रवारी रात्री राज्यातील ४९७ शासकीय आश्रमशाळामध्ये पूर्णत्वास जात आहे.

मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके हे राळेगाव विधानसभा मतदार संघातून भाजपकडून तिसऱ्यांदा आमदार झाले. २०१४ च्या युती सरकारमध्ये ते तीन महिने आदिवासी विकास मंत्री राहिले आहे. यावेळी निसटत्या मतांनी ते विजयी झाले. मात्र राज्यात महायुतीचे सरकार येताच त्यांना दुसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्री पदाची लॉटरी लागली.

 हे पद स्वीकारताच मंत्री उईके हे ॲक्शन मोडवर आले. त्यातच त्यांना आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या पदाला जणू चार चाँद लावले. त्यामुळे मंत्री उईके यांनी सर्वात आधी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला. यातूनच आश्रमशाळेत मुक्काम करण्याची संकल्पना पुढे आली.

या संकल्पनेतून आज शुक्रवारी मंत्र्यांसह आदिवासी विकास विभाग राज्यातील शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्काम करणार आहे.

या भेटीत सोई-सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४९७ आश्रमशाळांमध्ये आज एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासकीय आश्रम शाळाबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत, शाळेत पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रत्यक्षात लक्षात याव्या, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आदिवासी विभागाचे सचिव, आयुक्त, अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आश्रम शाळेत मुक्काम करून तेथील समस्या जाणून घेतील. जो ज्या शाळेत मुक्कामी असेल, ती शाळा ते अधिकारी दत्तक घेतील. प्रत्येक महिन्याला शाळेत भेट देवून आढावा घेतील व  तेथील अडचणी दूर करतील, अशी या उपक्रमाची रूपरेषा असल्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी ‘ लोकसत्ता ‘ शी बोलताना सांगितले.

 मुक्कामादरम्यान विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासोबतच आश्रमशाळेतील मुलभुत सोई-सुविधांची पाहणी केली जाणार आहे. अधिकारी नेमून दिलेल्या आश्रमशाळेत पुर्णवेळ उपस्थित राहून तपासणी अहवाल सादर करणार आहेत. अहवालाचे अवलोकन केल्यानंतर शाळानिहाय कृती कार्यक्रम तयार केला जाईल. या उपक्रमातून या आश्रमशाळांबद्दल असलेले गैरसमज सुरू होऊन शासकीय आश्रमशाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केला.

आदिवासी विकास मंत्री बोटोणी ‘येथे’ मुक्कामी

आदिवासी विकास मंत्री व  राज्यमंत्री दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके हे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील आश्रमशाळेत मुक्काम करणार आहेत. तर राज्यमंत्री इंद्रनिल नाईक हे पुसद तालुक्यातील आश्रमशाळेत मुक्कामी थांबणार आहेत. याशिवाय उमरखेड येथील आ.किसनराव वानखेडे हे सुध्दा त्यांच्या मतदारसंघातील आश्रमशाळेत मुक्कामी राहणार आहेत. जिल्ह्यातील पुसद आणि पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये काही मंत्रालयीन अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनीधी, आदिवासी विभागातील व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी मुक्कामी राहणार आहेत.

मंत्र्यांच्या या निर्णयाने आश्रमशाळेतील शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. मात्र हा मुक्काम पूर्वनियोजित असल्याने मंत्रिद्वय ज्या उद्देशाने आश्रम शाळेत मुक्कामी राहणार आहे, तो खरेच सफल होईल का, हे प्रश्नचिन्ह आहे.