विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अनिल अवचट यांना श्रद्धांजली
नागपूर : ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने चळवळीतील कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा व मराठी लेखनाला समृद्ध करणारा लेखक,मागदर्शक काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अनिल अवचट यांचे गुरूवारी पुण्यात निधन झाले. हे वृत्त नागपुरात येऊन थडकताच साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली. या क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना चळवळीतील कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा मागदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली.
उपेक्षित, दरिद्री, रुढीग्रस्त माणसांच्या, अगतिकतेची चित्रं अवचटांनी रेखाटली, मराठी साहित्य, लेखन आणि समाजाने त्यांच्या निधनाने एक विलक्षण व्यक्तिमत्त्व गमावली आहे., अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली.
१९९३ मध्ये अनिल अवचट नागपुरात आले होते त्यावेळी त्यांची लोकसत्तासाठी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत त्यांच्या लेखनाचे विषय आणि शैलीवर बरीच चर्चा झाली होती. अवचट आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लिहित राहिले. पण सुशिक्षितांच्या वास्तू, फलज्योतिष्य, आणि पुराणातील काल्पनिक गोष्टींना विज्ञानाचा मुलामा देणाऱ्या अंधश्रद्धा कधी जातील हाच प्रश्न आहे, या शब्दात नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख व समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी अवचट यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अवचट यांनी समाजातील अपेक्षित- दुर्लक्षित देवदासिंचे प्रश्न समजून घेऊन समाजासमोर त्यांनी मांडले. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे म्हणाले.
अनिल अवचट ज्या-ज्या वेळी नागपुरात येत त्यावेळी आवर्जून घरी येत असे. साधी राहणी आणि मनमिळावू स्वभाव ही त्यांची वैशिष्टे होती. ते अतिशय सुरेख रेखाटत होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील सदस्य गेल्याचे दु:ख आहे, अशी प्रतिक्रिया आधार संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश रोडे यांनी व्यक्त केली.
अनिल अवचट यांचे आमच्या जीवनातील स्थान वडिलांच्या स्थानी होते. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. यातून अनेकांना नवजीवन मिळाले.अनेक युवक व्यसनमुक्त झाले. जीवन कसे जगावे याबाबत ते नव्या पिढीला सांगायचे.त्यांच्या प्रेरणेतून मैत्री व्यसन मुक्ती केंद्र ही संस्था स्थापन केली. त्यांच्या निधनाने मार्गदर्श गमावला.
– रवी पाध्ये, मैत्री व्यसन मुक्ती केंद्र
अनिल अवचट यांच्यासारखा साहित्यिक , कलावंत, कार्यकर्ता दुर्मिळ असतो. त्यांच्या निधनाने मागदर्शक हरपला.
– रेखा दंडिगे घिया, सामाजिक कार्यकर्त्यां