नागपूर : शहरातील मोकाट श्वानांच्या उपद्रवामुळे नागपूरकर त्रस्त झाले होते. आता नागपूरकरांचा हा त्रास लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. मोकाट श्वानांच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेने शहराच्या जवळ चार जागा निश्चित केल्या आहेत. याबाबत गुरुवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती सादर करण्यात आली. निश्चित केलेल्या जागेवर मोकाट श्वानांच्या व्यवस्थापनाबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्या. अविनाश घरोटे आणि न्या. एम.एस. जवळकर यांच्या खंडपीठासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली.
शहरातील मोकाट श्वानांमुळे होणाऱ्या उपद्रवाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. न्यायालयीन आदेशानुसार, महापालिकेने गुरुवारी मोकाट श्वानांच्या व्यवस्थापनासाठी अंतिम चार जागांची यादी न्यायालयासमोर सादर केली. यामध्ये सर्वात जवळची जागा शहरापासून २३ किलोमीटर तर सर्वात दूरची जागा ६० किलोमीटरवर आहे. महापालिकेने दिलेल्या यादीनुसार, दुधबर्डी (४६ हेक्टर), तिष्टी (१३ हेक्टर), तोंडखैरी (१८.५५ हेक्टर) आणि तोंडखैरी (५२.७३ हेक्टर) या जागांचा समावेश आहे. तिष्टी येथील जागा टेकडीवर असून टेकडीवर समतोल भाग आहे तर उर्वरित तीन जागा जमिनीवर आहेत.
हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वसतिगृहांमध्ये लवकरच ‘ऑनलाईन’ प्रवेशप्रक्रिया
हेही वाचा – अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर
मोकाट श्वानांच्या व्यवस्थापनाकरिता जागा शोधण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने यापूर्वी सादर केलेल्या ४७ संभावित जागांचे अवलोकन करून चार जागा अंतिम करण्यात आल्या. आता निश्चित केलेल्या जागांवर कशाप्रकारे मोकाट श्वानांचे व्यवस्थापन करता येईल याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी १३ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.